मेहनत केली अन् विक्रम केला...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 03:17 PM2019-02-01T15:17:33+5:302019-02-01T15:19:06+5:30

३० नोव्हेंबर २०१८ सकाळचे अकरा वाजलेले... अथक परिश्रमाने ११ तास चालून किलीमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकविला... ...

Tried hard work and ...! | मेहनत केली अन् विक्रम केला...!

मेहनत केली अन् विक्रम केला...!

Next

३० नोव्हेंबर २०१८ सकाळचे अकरा वाजलेले... अथक परिश्रमाने ११ तास चालून किलीमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर भारताचा तिरंगा फडकविला... ‘भारत माता की जय’ म्हटलं. आणि सगळा शीण, सगळा तणाव निघून गेला. विसरून गेले मी दोन दिवस झाले आजारी आहे. आजारी इतकी की मला पाणी पचत नाही, उलटी होत आहे. पण हे सगळं असूनही छान वाटत होतं. मी आज जिंकले. स्वत:साठी मेहनत केली होती मी? किती पळापळ केली होती? 

माझा गाईड पिटर व त्याचा मित्र या दोघांनी मिळून माझं अभिनंदन केलं. त्यांना झालेला आनंद त्यांच्या हास्यातून प्रतिबिंबित होत होता. व्हायलाच पाहिजे ना? माझा त्रास, माझी वेदना त्या क्षणी पाहणारे माझे आपले असे दोघे-चौघेच तेथे होते. मला प्रोत्साहन देऊन माझे धैर्य वाढविणारे हे माझे खरोखरच सच्चे मित्र होते. छान वाटलं जेव्हा माणुसकी, आपलेपणा, जिव्हाळा, प्रेम मला या आफ्रिकेतील मित्रांमध्ये आढळला. त्याक्षणी हे दोघे माझ्यासाठी साक्षात माझा पांडुरंग अन् स्वामी समर्थ होते. वजा ५० तापमान अचानक घसरणीवर आल्यावर त्यांनी माझी घेतलेली काळजी माझ्यातला उत्साह वाढविणारी होती. 

‘आदल्या दिवशी माझी अवस्था पाहून माझा गाईड पिटर बोलला ‘जर तू ठीक असशील तर आपण पुढे जाऊ, अन्यथा...’ या वाक्याने मी क्षणभर निराश झाले. वाईट वाटून घेण्याची, दु:खी होण्याची माझी संवेदना संपून गेली होती, इतकी मी थकले होते. अंगात त्राण नव्हता, हीच लढाई होती माझ्या संयमाची, कणखरपणाची. मनात कोणताही नकारात्मक विचार आणला नाही. मला फक्त जिंकायचे होते. माझे लक्ष्य पूर्ण करायचे होते. आई-वडिलांना स्मरण करून नमस्कार केला.

स्वामी समर्थांना प्रार्थना केली, पडून राहिले. रात्री बारा वाजता माझा गाईड रूममध्ये आला. म्हणाला, तुम्ही ठीक आहे ना? मी खोटे बोलले हो म्हणून. कारण इतक्या दिवसांची मेहनत, कष्ट वाया घालवायचं नव्हतं. आयुष्यातून उठायला आणि आयुष्याच्या उत्तुंग शिखरावर जायला एक क्षण पुरेसा असतो. क्षणात काही घडू शकते. हे वाक्य आठवले. पांडुरंगाची कृपा झाली, गाईडने सकारात्मक निर्णय घेतला. मला शेवटच्या टप्प्यात साथ देण्याचा मोलाचा निर्णय त्यांनी घेतला.

तुम्ही काही खाल्ले तरच मी नेणार? गाईडनं हट्ट धरला. कुक लगेच काळी कॉफी आणि बिस्किटे घेऊन आला. माझी खायची इच्छा नव्हती. पोटात मळमळ, उलटी जरा देखील कमी व्हायला तयार नव्हती. मनाची ताकद, मनाची शक्ती अजमावून पाहायचा हा दिवस होता. मनाने खंबीर होऊन मला शिखर सर करायचे होते. मन आणि शरीर या दोन्हींच्या युद्धात मला दोघांना घेऊन जिंकायचे होते. कॉफी आणि दोन बिस्किटे घेतली. यानंतर गाईडनी बॅगमधून कपडे काढले. पाच ते सहा टी शर्ट घालायला लावले. जर्किन घातली. समिटसाठी आणलेली पॅण्ट घातली. आहे त्या ट्रेकसूट थर्मलवर स्वेटर घातला आणि गिर्यारोहणाला सज्ज झाले. 

माणूस मैत्री निभावत नाही, पण निसर्ग आपल्याला एकटं सोडत नाही. अर्धा तास झाला असेल आम्हाला निघून, क्षणात चित्र पालटले. प्रचंड थंडी आणि गार वारे सुटले. याला सोबत म्हणून की काय, हिमवर्षाव सुरू झाला. कसोटीचा क्षण होता. थकलेल्या शरीराला आणखीन कणखर होऊन चालायची ही वेळ होती. तोंडावर हिमवर्षाव सपासप मारत होता. श्वास घ्यायला त्रास होत होता. सोबतीला सतत होणारी उलटी होतीच. सोबत असलेल्या बाटलीमधील पाणीदेखील बर्फ झाले होते. पण सतत मी थोडे थोडे पाणी पित होतेच. चालताना अखेरच्या टप्प्यात उंच चढण होती.

सभोवतालच्या डोंगरावर पडलेलं बर्फ आणि त्यावर एक प्रकाशाचा कवडसा खूप सुरेख वाटत होता. अवघड, अतिशय अवघड चढण पार करून वर पोहोचले. मी टांझानिया देशामध्ये आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर किलीमांजारो सर केले होते. १९,३४१ फूट उंचीवर असलेल्या या सर्वोच्च शिखरावरील एका दगडावर दहा मिनिटे बसले. मला, मी स्वप्नात आहे का असे वाटत होते. हा भास नाही खरं आहे हे जाणवलं तेव्हा बॅगेतून भारताचाच राष्ट्रध्वज काढला आणि ‘भारत माता की जय’ म्हणत डौलाने फडकविला. अथक परिश्रमाने मिळविलेला हा विजय फक्त माझा नाही, संपूर्ण शिक्षक वर्गाचा आहे. आज मी किलीमांजारो या आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर पोहोचणारी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शिक्षिका ठरले. जिने हिवाळ्यात प्रचंड थंडी, बदलत जाणाºयो वातावरणाचे आव्हान पेलून शिखर सर केले. माझ्या समस्त विद्यार्थी दैवतांपुढे हा एक आदर्श कायम राहील, यात शंका नाही.
-अनुराधा साखरे-काजळे
(लेखिका या गिर्यारोहक आहेत)

Web Title: Tried hard work and ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.