भीषण! दोन दुचाकींसह कारचा तिहेरी अपघात; २२ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, ४ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 19:37 IST2024-12-27T19:36:54+5:302024-12-27T19:37:24+5:30
सांगोला-पंढरपूर रोडवरील मांजरी गावाजवळ अपघात.

भीषण! दोन दुचाकींसह कारचा तिहेरी अपघात; २२ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, ४ जखमी
सांगोला : भरधाव दोन दुचाकींची जोराची धडक होऊन कारमध्ये तिहेरी अपघातात अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेल्या एका २२ वर्षीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवार, २६ रोजी दुपारी १:३० च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील मांजरी (देवकाते वाडी) पाटीजवळ घडला. सुनील संजय मोटे असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
या अपघातात दोन दुचाकींवरील दोन विद्यार्थ्यांसह पती-पत्नी जखमी झाले असून त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितीन काशिनाथ राठोड (ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा), शुभम मोहन हाके (चळे ता. पंढरपूर), धनाजी गणपत साळुंखे यांच्यासह त्यांच्या पत्नी अशी जखमींची नावे आहेत. याबाबत, सांगोला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम फुले यांनी माहिती दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिस हेडकॉन्स्टेबल नवनाथ कोकरे व पोलिस नाईक निशांत सावंजी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णवाहिकेत उपचारासाठी सांगोल्यात पाठवून दिले व अपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
अपघातानंतर जखमीस सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला. तर शुभम हाके या विद्यार्थ्याचा डावा पाय फॅक्चर झाला असून नितीन राठोड हा विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर उपचार करून घरी सोडले तर अपघातग्रस्त दुसऱ्या दुचाकीवरील धनाजी साळुंखेसह त्याची पत्नी जखमी झाल्याने त्यांच्यावर सांगोल्यात खासगी रुग्णालयात उपचारानंतर घरी सोडले. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल माळी करीत आहे.
दुचाकीवरून निघाले होते ट्रिपल सीट..
पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुनील मोटे, नितीन राठोड व शुभम हाके असे तिघेजण मित्र गुरुवारी दुपारी १ च्या सुमारास सांगोल्यात मित्राला भेटून एमएच. १३, सीएन. २२६७ या दुचाकीवरून ट्रिपल सीट सांगोला-पंढरपूर निघाले होते. त्यांची दुचाकी मांजरी गावाजवळ आली असता नेमके देवकाते वाडीकडून डाव्या बाजूने येणाऱ्या एमएच. ४५, एक्स. ४२१५ या दुचा दुचाकीने सुनील मोटे त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे दुचाकीवरील सुनील मोटे हा विद्यार्थी उडून पंढरपूर (संगे वाडी) कडून येणाऱ्या एमएच.१०, डीव्ही ९६७७ कारसमोर पडल्याने त्यास कारची जोराची धडक बसली. त्याच्या डोक्यास गंभीर मार लागून तो जखमी झाला.