ज्वारीचा भाव वधारल्यानं कष्टाची भाकर झाली महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:35 PM2018-12-26T12:35:04+5:302018-12-26T12:50:22+5:30
संतोष आचलारे सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन दरवाढ झाली आहे. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या ...
संतोष आचलारे
सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारीच्या उत्पादनात घट होऊन दरवाढ झाली आहे. त्यामुळे गरिबांच्या चुलीवरील भाकर आता श्रीमंतांच्या गॅसकडे फिरत आहे. ज्वारीचे उत्पादनाच प्रचंड कमी झाल्याने ग्रामीण भागातही चुलीवर सर्रास चपाती दिसू लागली आहे. सोलापुरात हॉटेल्स, खानावळीत १५ रुपयाला एक भाकर मिळत असल्याने गरिबांची भाकर, श्रीमंतांची ठरत आहे.
गत दोन वर्षांपासून ज्वारीच्या उत्पादनात घट झाली आहे. यंदाच्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे जेमतेम ज्वारीची १५ ते २० टक्केच पेरणी झाली आहे. त्यामुळे यापुढील काळात गरिबांची भाकर आणखीनच महागणार आहे. सोलापुरात किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपये प्रति किलो दराने ज्वारीची विक्री होत आहे. हॉटेल व ढाब्यावर १५ रुपयाला एक याप्रमाणे भाकर ग्राहकांना देण्यात येत आहे. चपाती दहा रुपयाला एक मिळत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची पसंती चपाती खाण्याकडेच दिसून येत आहे.
सोलापूर जिल्हा ज्वारीच्या उत्पादनासाठी राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा पाऊसच नसल्याने ज्वारीची पेरणी झाली नाही. पेरणी कमी झाल्याने व मागील वर्षातील ज्वारीच्या कमी उत्पादनामुळे दरवाढ सातत्याने होताना दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी तब्बल ५० टक्क्यांपेक्षा जास्त दरवाढ झाल्याची माहिती किरकोळ दुकानदारांकडून देण्यात येत आहे.
शेतकरी व कष्टकरी वर्गात भाकरी अधिक प्रेमळ आहे.
पिटलं अन् भाकर असे समीकरणच गरीब कुटुंबात खाण्यासाठी असते. मात्र ४० रुपये किलोची ज्वारी घेण्यापेक्षा बाजारातील ३० रुपये किलोचा गहू किंवा रेशन दुकानातील गहू खरेदी करण्याकडे कल सर्वसामान्य कुटुंबाचा दिसून येत आहे. पूर्व भागातील टॉवेल कारखान्यात व विडी उद्योगात काम करणाºया महिलांचा स्वस्त अन्न म्हणून रेशनचा गहू खरेदीकडे कल दिसून येतो. ज्वारीचे दर जास्त असल्याने महिन्यातून एकदा सणाप्रमाणे भाकर करण्याची प्रथाच सर्वसामान्य कुटुंबात होत आहे.
जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाºया शेतकरी कुटुंबातही यंदा ज्वारीची पोती गायब झाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना आता केवळ रेशनच्या गव्हाचा पर्याय उरला आहे. दुष्काळी परिस्थितीने पाटील किंवा देशमुखांच्या वाड्याभोवती यंदा भाकर फिरताना दिसून येत आहे.
ज्वारीच नाही...
च्दुष्काळामुळे ज्वारीचं पीकच येत नाही. बाजारात ४० रुपयांपेक्षा जास्त दराने एक किलो ज्वारी मिळत आहे. त्यामुळे भाकरी नाईलाजाने १५ रुपयाला एक याप्रमाणे विकण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयासमोर भाकरी विकणाºया मलिका शेख यांनी दिली.
चुलीवरील भाकरीची चवच निराळी असल्यानं आमच्यासारख्या सर्वसामान्यांची भाकर आवडती होती. मात्र चपातीपेक्षा भाकरी खूपच महाग झाल्यानं आता भाकर श्रीमंतांनीच खावी, आमच्यासारख्या सर्वसामान्यांनी नव्हे अशी प्रतिक्रिया भाकर खाण्यासाठी आलेला युवक अमर पाटील यांनी दिली.
- अमर पाटील
ग्राहक.