तरूणीच्या मृत्यूप्रकरणी हॉस्पिटलमध्ये तोडफोड, सोलापुरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:58 PM2018-10-16T16:58:42+5:302018-10-16T16:59:39+5:30
चुकीचे उपचार केल्याचा नातेवाईकांचा आरोप
सोलापूर : जुळे सोलापुरातील मोर्नाच हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सम्पदा प्रविणकुमार घम (वय-१८ रा. मुक्तेश्वर गृह निर्माण सह.संस्था, जुळे सोलापूर) या तरूणीचा मृत्यू झाला. हा प्रकार सकाळी ८ वाजता उघडकीस आला़ नातेवाईकांनी जाब विचारत हॉस्पिटलमध्ये फोडफोड केली. चुकीचे उपचार केल्याने मुलीचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
सम्पदा घम ही संगमेश्वर महाविद्यालयात इयत्ता १२ वी शास्त्र शाखेत शिकत आहे. तिला त्रास होत असल्याने १४ आॅक्टोंबर रोजी दुपारी ११.३0 वाजता मामाने जुळे सोलापुरातील मोनार्च हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान तिच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या होत्या. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले होत़े़ मात्र किडनी स्टोनचा आजार निष्पन्न झाला होता. तिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रविवारी व सोमवारी दिवसभर ती व्यवस्थीत होती.
सोमवारी रात्री ७.३0 वाजता गोळ्या आणि इंजेशक्शन दिल्यानंतर ती झोपली़ पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ती अचानक उठून ‘आई गं’ असे म्हणाली. नातेवाईकांनी चौकशी केली असता नर्सने काहीच झाले नसून ती झोपली आहे़ तिला झोपु द्या, असे सांगितले. मात्र सकाळी ती काहीच हलचाल करीत नसल्याचे नर्सच्या लक्षात आले. त्यांनी डॉक्टरांना कळविल्यावर तपासणी केली आणि तत्काळ तिसºया मजल्यावरील ‘आयसीयु’मध्ये दाखल केले. सकाळी ८ वाजता ती मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हा प्रकार समजताच नातेवाईकांनी गर्दी केली. तिच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त करीत मामाने गोंधळ घातला, यात जिन्यावरील काच फोडली़ तरूणीचे पार्थिव शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले.