अंत्यविधीनंतर उरकून निघालेल्या महिलांच्या जमावात ट्रक धुसला; दोन सूना ठार, तिघे जखमी
By काशिनाथ वाघमारे | Published: May 20, 2023 07:03 PM2023-05-20T19:03:30+5:302023-05-20T19:04:22+5:30
अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्व पाहुणे गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत आले.
काशिनाथ वाघमारे, सोलापूर: सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या दोन सुनांचा माघारी येताना वाटेत ट्रकच्या धडकेने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास गुरसाळे (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. हिराबाई भारत गुटाळ (वय ३५) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ४०) असे अपघातात मरण पावलेल्या दोन सुनांची नावे असून शनिवारी रात्री ११ वाजता हा अपघात झाला.
पुनर्वसन टाकळी - गुरसाळे (ता. पंढरपूर ) येथील गेनदेव मनोहर गुटाळ यांचे शुक्रवार, १९ मे रोजी सायंकाळी ५ वाजता रोजी निधन झाले.
अंत्यविधीसाठी त्यांचा मुलगा गोरख गुटाळ हे मुक्ताबाई गुटाळ यांच्यासह कुगाव (ता. करमाळा) येथून पुनर्वसन टाकळी - गुरसाळे येथे आले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कारासाठी जमलेले सर्व पाहुणे गुरसाळे गावच्या स्मशानभूमीत आले.
अंत्यविधी उरकून घरी परत निघालेल्या शोकाकूल महिलांच्या जमावात करकंबहून भरधाव वेगात निघालेला (टी.एन. ५२/ एम. ३५६४) मालट्रक घुसला. यामुळे लोकांची धावपळ झाली. या अपघातात मयत गेनदेव गुटाळ यांच्या सून हिराबाई भारत गुटाळ (वय ३५) व मुक्ताबाई गोरख गुटाळ (वय ४०) या दोन सुनांचा मृत्यू झाला तर दत्तात्रय अजिनाथ सरडे, सुनीता महादेव गुटाळ, आनंदाबाई धनेश्वर साळुंखे (तिघेही रा. चिखलठाण, ता. करमाळा), सुधामती साहेबराव धुमाळ (रा. सिद्धेश्वर निंबवडी, ता. बारामती), अनिता उर्फ गीतांजली जयहिंद देवकर (रा. सुगाव भोसे, ता. पंढरपूर) हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने कुगाव (ता. करमाळा) व पुनर्वसन टाकळी - गुरसाळे (ता. पंढरपूर) या गावांत हळहळ व्यक्त केली जात आहे.