ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 11:56 AM2018-12-17T11:56:26+5:302018-12-17T11:56:55+5:30

ऐंशीच्या दशकातील आजची कोर्ट स्टोरी. ‘ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ (सत्य कधी कधी फारच आश्चर्यकारक असते.) याचा अनुभव देणारी.  ...

True is Strangers Done Fiction! | ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन !

ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन !

Next

ऐंशीच्या दशकातील आजची कोर्ट स्टोरी. ‘ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन’ (सत्य कधी कधी फारच आश्चर्यकारक असते.) याचा अनुभव देणारी. 
अनैतिक संंबंधातून जन्मलेल्या एक दिवसाच्या नवजात कन्येचा जमिनीवर आपटून खून केल्याचा आरोप प्रकाशवर होता. खटल्याबद्दल प्रकाशने जे सांगितले ते फार धक्कादायक होते. 

 प्रकाश व सदाशिव या दोन जुळ्या भावांच्या स्वभावात दोन ध्रुवांचे अंतर होते. प्रकाश अतिशय कष्टाळू, सरळ स्वभावाचा, सद्गुणी तर सदाशिव व्यसनी, भानगडखोर, पाताळयंत्री, तामसी स्वभावाचा. प्रकाश शेतात राबून, कष्ट करून भरपूर उत्पन्न घेत होता. दुराचारी सदाशिवने आपली व्यसने भागविण्यासाठी सर्व जमिनीची वाट लावली होती. 

नवºयाने टाकून दिलेली सदाशिवची देखणी, नटवी मेव्हणी सदाशिवच्याच घरात राहत होती. स्वत:ची अधोगती झाली असताना भाऊ प्रकाश याचा होत असलेला उत्कर्ष सदाशिवला पाहावत नव्हता. मत्सराने त्याला ग्रासले होते. तो सतत भाऊ प्रकाशचा द्वेष करीत असे. सदाशिवने भावाच्या सुखी घराला काडी लावण्याचा सुनियोजित डाव आखला होता. घरात असलेल्या मेव्हणीच्या नादाला प्रकाशला लावायचे आणि त्याचे घर बरबाद करायचे, असा तो डाव होता.

दररोज प्रकाश भल्या सकाळी शेतात जात असे आणि तेथे राबून सायंकाळी घरी परत येत असे. सदाशिवने त्याच्या देखण्या चालबाज मेव्हणीला प्रकाशच्या शेतात पाठविण्यास सुरुवात केली. परिणामी, प्रकाशचा ‘विश्वामित्र’ झाला. जसे मेनकेने विश्वामित्राला भुलवले तसे सदाशिवच्या मेव्हणीने प्रकाशला भुलवले. प्रकाशचा अंकूर तिच्या उदरात फुलू लागला. एव्हाना, सदाशिवचा डाव यशस्वी झाला होता. सदाशिवने काही दिवसानंतर गरोदर मेव्हणीला प्रकाशच्या घरात घुसवले. शांतीने, सुख-समाधानाने फुललेले प्रकाशचे घर अशांतीने कोमेजून गेले. प्रकाशच्या कौटुंबिक जीवनात अंधार दाटून आला. प्रकाशच्या घरात अंधार आला. दिवस भरल्यानंतर सकाळी घरातच सदाशिवची मेव्हणी प्रसूत झाली आणि तिला मुलगी झाली. मेव्हणीने नुकत्याच जन्मलेल्या मुलीला जमिनीवर आपटले आणि किंचाळी फोडली. पद्धतशीरपणे ठरलेल्या डावाप्रमाणे शेजारीच राहणारा सदाशिव लगेचच पळत घरात आला. मेव्हणीने सांगितले, प्रकाशरावांनी माझ्या मुलीला जमिनीवर आपटून मारले.

सदाशिवने भाऊ प्रकाशला चांगलेच खडसावले आणि तो म्हणाला, निम्मी जमीन मेव्हणीच्या नावावर खरेदी करुन दे, नाही तर खुनाची फिर्याद देतो. झालेल्या प्रकारामुळे प्रकाश पार हादरुन गेला होता. त्याने भावापुढे शरणागती पत्करली. ठरल्याप्रमाणे प्रकाश, सदाशिव आणि ओली बाळंतीण मेव्हणी सकाळी अकरा वाजता पंढरपूरच्या सबरजिस्ट्रार आॅफिसमध्ये आले. तेथे प्रकाशने मेव्हणीला निम्म्या जमिनीचे खरेदीखत करुन दिले. खरेदीखत झाल्यावर ठरलेल्या षङ्यंत्राप्रमाणे सदाशिव आपल्या मेव्हणीसह थेट पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गेला. अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीचा प्रकाशने आपटून खून केला, अशी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी प्रकाशला अटक करुन जेलमध्ये टाकले.

त्यावेळी आजच्या सारखे तंत्रज्ञान प्रगत नव्हते. साध्या झेरॉक्सचाही उदय झाला नव्हता. खरेदीखते पुण्याला फोटो झिंको प्रेसला पाठवली जात होती. त्याचे फोटो काढून रजिस्टर आॅफिसला मूळ खरेदीखताबरोबर पाठवले जात होते. या प्रक्रियेला सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागत असे.

खरेदीखत सकाळी ११.३० वाजता झाले आणि पोलीस ठाण्यात दुपारी १२.३० वाजता फिर्याद दिली गेली असे प्रकाशचे म्हणणे होते. खरेदीखताची नक्कल हातात नव्हती. खरोखरी खरेदीखतावर नोंदणीची काय वेळ आहे हे बघणे अत्यंत गरजेचे होते. माझे सहकारी अ‍ॅड. भगवान वैद्य यांना पुण्याला फोटो झिंको प्रेसमध्ये जाऊन खरेदीखत बघण्यासाठी पाठविले. तब्बल चार दिवस फोटो झिंको प्रेसला हेलपाटे मारुन अ‍ॅड. भगवान वैद्य यांनी ते खरेदीखत बघितले. त्या खरेदीखतावर सकाळच्या ११.३० ची वेळ नोंद होती. तसा त्यांचा ट्रंक कॉल आला. 

यथावकाश न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरु झाली. सदाशिवच्या मेव्हणीने खरेदीखताबद्दलचे प्रश्न सहजगत्या उडवून लावले. आम्ही फोटो झिंको प्रेसमधून  खरेदीखताची मूळ, अस्सल प्रत मागवून न्यायालयात हजर केली. त्यावरच्या वेळेची नोंद बघून न्यायाधीशांना आमचे म्हणणे पटले. प्रकाशची निर्दोष मुक्तता झाली. खुनाच्या आरोपामुळे काळवंडून गेलेले प्रकाशचे जीवन पुन्हा उजळून निघाले. त्याच्या जीवनात पुन्हा सुखाची पहाट उगवली. 

बघा दुनियादारी ! भावाचा उत्कर्ष सहन न होणारा, मत्सराने भरुन गेलेला जुळा भाऊ, घरी नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे प्रेत घरात ठेवून खरेदीखतासाठी जाणारी ओली बाळंतीण आई ! 
परंतु न्यायालयात अखेर ‘दूध का दूध और पानी का पानी’ झाले. सच्चा आणि झुठा याचा फैसला अखेर न्यायालयात झालाच.  
‘ट्रूथ इज आॅल्वेज स्ट्रेंजर दॅन फिक्शन !’
- अ‍ॅड. धनंजय माने
(लेखक हे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत )

Web Title: True is Strangers Done Fiction!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.