कंदलगाव येथे बँक फोडण्याचा प्रयत्न, जाता जाता चोरट्यांनी केली संगणकाची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2018 12:25 PM2018-11-03T12:25:05+5:302018-11-03T12:30:42+5:30
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बँक आॅफ इंडियाची शाखा फोडून चोरट्याने आतील संगणकाची मोडतोड केली.
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथील बँक आॅफ इंडियाची शाखा फोडून चोरट्याने आतील संगणकाची मोडतोड केली. शनिवारी पहाटे पावणेतीन वाजता हा प्रकार घडला. एटीएम व स्ट्राँगरुम फोडता न आल्याने चोरट्यांनी जाताना एका घरात व पानटपरीत चोरीचा प्रयत्न केला.
कंदलगावात तेलगाव रस्त्यावर कोले यांच्या जागेत बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या शाखेत पहाटे साडेतीन वाजेच्या सुमाराला चोरट्यांनी प्रवेश केला. चोरट्यांनी सुरुवातीला बँकेसमोर असलेल्या एटीएमच्या शटरचे कुलूप तोडून बाजूला फेकले. सेंट्रल लॉकमध्ये शटर उघडले नाही. त्यामुळे चोरट्यांनी शाखेकडे मोर्चा वळविला.
शाखेचे शटर उचकटून आत प्रवेश केला. स्ट्राँगरुम उघडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला. पण त्यात यश न आल्याने शाखा व्यवस्थापकाच्या केबीनमध्ये प्रवेश करून तेथील संगणकाचा सीपीओ खाली टाकला. की बोर्डची मोडतोड केली. जाताना चोरट्यांनी बँकेसमोरील एक पानटपरी फोडली. या ठिकाणीही काही हाती न लागल्याने आतील सामानाची उलथापालथ केली. याच रस्त्यावरील एक बंद घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला.
सकाळी सात वाजता गावात चोरी झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. बँकेचे शिपाई शिवराम कोळी यांनी दिलेल्या माहितीवरून शाखा व्यवस्थापक शांतप्पा सलगरे यांनी आठ वाजता घटनास्थळी धाव घेतली व मंद्रुप पोलिसांना माहिती दिली. सपोनि धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अधीक्षक कार्यालयातील ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आले. शाखा व्यवस्थापक सलगरे यांची फिर्याद घेऊन मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सपोनि धांडे यांनी सांगितले.