सोलापूरच्या गड्डा यात्रेला परवानगी द्या; देवस्थान समितीचे महापालिकेला निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2021 05:17 PM2021-12-07T17:17:37+5:302021-12-07T17:17:44+5:30
देवस्थान समितीचे महापालिका पदाधिकारी, प्रशासनाला निवेदन
साेलापूर -पंढरपूरच्या कार्तिकी यात्रेच्या धर्तीवर शहरात ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा भरविण्यास परवानगी द्या, अशी मागणी सिद्धेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी साेमवारी महापाैर श्रीकांचना यन्नम आणि पालिका प्रशासनाकडे केली.
देवस्थान यात्रा समितीचे अध्यक्ष भीमाशंकर पटणे, बाळासाहेब भाेगडे, नगरसेवक नागेश भाेगडे, बसवराज अष्टगी यांनी महापाैर यन्नम, उपायुक्त धनराज पांडे यांना निवेदन दिले. दरवर्षी १५ ते ३१ जानेवारी या कालावधीत ग्रामदैवत सिद्धेश्वराची यात्रा भरते. १२ ते १६ जानेवारी या कालावधीत धार्मिक विधी हाेतात. हाेम मैदान व सिद्धेश्वर मंदिर परिसरात १ ते ३१ जानेवारी या कालावधीत करमणुकीची साधने, खाद्यपदार्थांचे स्टाॅल लावले जातात. ही यात्रा केवळ शहरच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातील, खेड्यापाड्यातील लाेकांसाठी आनंदाची पर्वणी असते.
गेल्या वर्षी काेराेना महामारीमुळे शासनाने मर्यादित भक्तांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करण्यास परवानगी दिली. काेविड नियमांचे पालन करूनच धार्मिक विधी करण्यात आले. सध्या काेराेनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे संपला नसला तरी बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. देशभरात विविध सामाजिक, राजकीय कार्यक्रम माेठ्या प्रमाणावर हाेत आहेत. नुकतेच पंढरपूरची कार्तिकी एकादशी निर्विघ्नपणे पार पडली. या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर यात्रेतील धार्मिक विधी व गड्डा यात्रा भरविण्यास परवानगी द्यावी अशी मागणी पटणे यांनी केली.
--
काेराेना नियमांचे पालन करूच
मागील वर्षी प्रशासनाने लावलेले निर्बंध पाळूनच आम्ही यात्रा केली. काेणत्याही प्रकारचा त्रास हाेऊ दिला नाही. यंदाच्या वर्षीही प्रशासनाने काेराेना रुग्ण कमी झाल्याचा विचार करून यात्रेला परवानगी देणे आवश्यक आहे, अन्यथा व्यापाऱ्यांचे माेठे नुकसान हाेणार आहे. भक्तही नाराज हाेणार आहेत, असे बाळासाहेब भाेगडे आणि नागेश भाेगडे म्हणाले.