क्षयरुग्ण शोधमोहिमेस सुरुवात, पाच दिवसात आढळले ३४ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 01:09 PM2023-03-13T13:09:17+5:302023-03-13T13:09:57+5:30
8 ते 21 मार्च दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विशेषत दाट लोक वस्ती ठीकाणी क्षयरोग शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.
सोलापूर : दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला असल्यास क्षयरोग असू शकतो. हे तपासण्यासाठी 8 ते 21 मार्च दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण भागात व विशेषत दाट लोक वस्ती ठीकाणी क्षयरोग शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. आरोग्य सेवक हे घरोघरी जाऊन नागरिकांनी तपासणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ सोनिया बागडे यांनी दिली.
जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवली जाणार आहे. यासाठी आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. नागरिकांनी आजाराची माहिती न लपवता ती सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना देणे अपेक्षित आहे. त्यात प्रामुख्याने ग्रामीण शहरी भागातील अति जोखमीचे घरांकडे विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे डॉ. बागडे यांनी सांगितले.
मंगळवारी आरोग्य मेळावा
घरी येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यास व स्वयंसेविकांना आपली माहिती देऊन मदत करावी. 14 मार्च 2023 रोजी जिल्ह्यातील सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र अंतर्गत घेणाऱ्या आरोग्य मेळाव्यामध्ये क्षयरोग विषयी उपक्रम राबवण्यात येणार असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ मीनाक्षी बनसोडे यांनी केले आहे.
प्राथमिक केंद्र उपकेंद्रनिहाय पथक
यासाठी जिल्ह्यातील 77 प्राथमिक आरोग्य केंद्र 431 उपकेंद्रातील सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात येत आहे. आत्तापर्यंत झालेल्या सर्व्हेक्षणात 34 क्षयरुग्ण आढळले आहेत. या रुग्णांवर सध्या उपचार करण्यात येत आहेत.