सोलापुरातील मंगळवार बाजार बनला गरिबांचा मॉल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:55 PM2019-05-30T13:55:05+5:302019-05-30T13:58:41+5:30
अॅण्टिक पीससाठी बाजारवारी; एका पार्टसाठी विकत घेतल्या जातात जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू
सोलापूर : टाकून दिलेल्या अन् भंगारात गेलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू... कधी-कधी यामधील एखादा पार्ट कामाचा असतो. तो पार्ट हवा असेल तर ती वस्तूच विकत घ्यावी लागते. लक बाय चान्स लागला तर भंगारातून घेतलेल्या या वस्तू किमान सहा महिन्यांसाठी हमी देत असतात. जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारात फेरफटका मारताना हौशी सोलापूरकर अॅण्टिक पीस घेण्याच्या शोधात दर मंगळवारी बाजारवारी करीत असतात.
ब्रिटिशकालीन मंगळवार बाजारात केवळ भाजीपाला, धान्य अन् संसारोपयोगी साहित्यच मिळते असे नाही. जुन्या चपलांपासून ते सायकली, टाकून दिलेल्या शर्ट, पॅण्ट, साड्यांपासून ते जुनी पुस्तके, जुने लोखंडी साहित्यापासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा बाजार याच बाजारात वर्षानुवर्षे भरतो आहे.
या बाजारात जुने मोबाईल, चॉर्जर, बॅटºया, पॉवर बँक, टी. व्ही. हेडफोन, रेडिओ, लॅपटॉप विक्रीचा जणू उघडा मॉल भरलेला असतो. आपल्याला नेमकी कुठली वस्तू हवी असेल तर कधी-कधी मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप रिपेअर करणाºया मेकॅनिकचा सल्ला घेऊन अथवा कधी-कधी त्यांना सोबत घेऊन ग्राहक जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करीत असतात.
मंगळवार बाजारातील जुन्या बाजारात दुर्मिळ वस्तू (अॅण्टिक पीस) शोधणाºयांचा एक वर्ग आहे. सकाळी साडेनऊ ते दुपारी १२ पर्यंत असे ग्राहक आवर्जून बाजारात दिसत असतात.
जुना मोबाईल घ्या... बदला डिस्प्ले!
- कधी-कधी मोबाईल हाताळताना हातातून तो खाली पडतो. मोबाईलचा डिस्प्ले आणि स्क्रीन खराब होतो. नव्याने तो बदलून घ्यायचे म्हटले तर अधिक खर्च येतो. यासाठी आपल्याजवळील जो मोबाईल आहे, त्याच मोबाईलचा शोध ग्राहक बाजारात घेत असतात. मिळाला तर दीड-दोनशे रुपयांमध्ये तो मिळूनही जातो. मग त्या मोबाईलचा डिस्प्ले वापरून कसे-बसे कामही भागते.
विक्रीस आलेल्या वस्तू भंगारातही जातात !
- मंगळवार बाजारात विक्रीस येणाºया सर्वच जुन्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची हमी मिळत नाही. मुंबईहून एका लॉटमध्ये या वस्तू व्यापाºयांना विकत घ्यावे लागतात. त्यातील ६० ते ७० टक्के वस्तूंची विक्री होते. राहिलेल्या वस्तू कवडीमोल किमतीने भंगारवाल्यांना द्यावे लागते, असे गेल्या २६ वर्षांपासून व्यवसाय करणारे इरफान शेख यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
एखादी दुर्मिळ वस्तू मिळाली तर त्याचा अधिकच आनंद असतो. अशा वस्तू घर अथवा दुकानांमध्ये खास आकर्षण ठरत असतात. अशा वस्तूंचा शोध मी दर मंगळवारी एक फेरफटका मारून घेत असतो.
-गिरीश शंकू, व्यापारी.