तुकाराम बीज उत्सव; विठ्ठल रथ सोहळ्याचे पंढरपूरहून देहूकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:12 AM2020-02-26T11:12:24+5:302020-02-26T11:14:51+5:30
शेकडो वारकरी सहभागी; नामदेव पायरीजवळ झाली सामुदायिक प्रार्थना व आरती
पंढरपूर : संत तुकाराम बीजेनिमित्त श्री विठ्ठल रथाचे पंढरपूर विठ्ठल-रूक्मिणी मंदीरासमोरील नामदेव पायरी येथून हरिनामाच्या जयघोषात प्रस्थान झाले. त्याआधी सामुदायिक प्रार्थना व आरती झाली. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते पादुका रथामध्ये स्थापन करण्यात आल्या. या सोहळ्यात शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत.
दरम्यान, कैकाडी महाराज आश्रमात आलेल्या वारकºयांकडून दिवसभर भजन, कीर्तन, हरिपाठ झाला. त्यानंतर रथ हा विठ्ठल मंदिराकडे आणण्यात आला. हरिनामाचा जयघोष करीत हा सोहळा सायंकाळी ६ वाजता मार्गस्थ झाला. दि. १० मार्च रोजी हा सोहळा देहू येथे पोहोचणार आहे. संत कैकाडी महाराज यांचे पुतणे ह.भ.प. रामदास उर्फ शिवराज महाराज यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला ३५० वर्षे होऊन गेली, हा सोहळा अखंडितपणे सुरू आहे. या पालखी सोहळ्यात महिला, पुरूष वारकरी सहभागी झाले आहेत. दुपारची विश्रांती, रात्रीचा मुक्काम तसेच त्यासाठीचे अन्नदाते याचे नियोजन करण्यात आले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी भजन, कीर्तनाचे कार्यक्रम होतात. विविध भागांतून आलेल्या भाविकांकडून या सोहळ्यासाठी देगणी दिली जाते. तुकाराम बीजेच्या एक दिवस आधी दि. १० मार्च रोजी हा सोहळा देहू येथे पोहोचणार आहे.
विठ्ठल रथ सोहळ्याची शेकडो वर्षांची परंपरा जपत आलो आहे. यामध्ये वारकरी उत्साहाने सहभागी होतात. तुकाराम भेटीकरिता देव चालला हे कीर्तनातून सांगतो. रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा रथ आणला जातो. हे दोन सोहळे साजरे केले जातात. याला वारकरी प्रतिसाद देतात.
- ह.भ.प. रामदास महाराज जाधव