उद्या चंद्रग्रहण; तुळशी विवाह करता येईल का?... वाचा, शास्त्र काय सांगतं
By Appasaheb.patil | Published: November 7, 2022 04:15 PM2022-11-07T16:15:08+5:302022-11-07T18:01:05+5:30
२५ ऑक्टोबरला झालेल्या सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला २०२२ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : पौर्णिमेचे दिवशी मंगळवारी (दि. ८) तुलशी विवाह समाप्ती आहे. ८ नोव्हेंबर रोजी मंगळवारी चंद्रग्रहण असल्याने सायंकाळी ६:१९ नंतर म्हणजे ग्रहणमोक्ष झाल्यावर स्नान करून नंतर तुलशी विवाह करता येईल. दरम्यान, यावर्षी पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र असा एकत्र योग होत नसल्याने कार्तिकस्वामी दर्शन योग मिळत नसल्याचे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
२५ ऑक्टोबरला झालेल्या सूर्यग्रहणानंतर १५ दिवसांनी म्हणजेच ८ नोव्हेंबरला २०२२ या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. या दिवशी चंद्रावर पृथ्वीची सावली पडणार असून, तो लाल रंगाचा दिसणार आहे. यालाच इंग्रजीमध्ये ‘ब्लड मून’ असेही म्हणतात. जवळपास तीन वर्षांनंतर हे सुंदर दृश्य पाहायला मिळणार आहे. २०२२ वर्षातील हे शेवटचे चंद्रग्रहण असल्याची माहिती पंचांगकर्ते दाते यांनी सांगितले.
-------------
कोणी पाळावे चंद्रग्रहण?
हे ग्रहण ग्रस्तोदित असल्याने मंगळवारी ९ नोव्हेंबरच्या सूर्योदयापासून मोक्षापर्यंत (सायंकाळी ६:१९ पर्यंत) ग्रहणाचे वेध पाळावेत. बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी मंगळवारी सकाळी ११ पासून सूर्यास्तापर्यंत वेध पाळावेत. वेध काळात भोजन करू नये. मात्र वेध काळात देवपूजा, श्राद्ध, कुलधर्म, कुलाचार पूजन, पाणी पिणे, झोपणे, मलमूत्रोत्सर्ग इ. गोष्टी करता येतील. फक्त सूर्यास्तानंतर ६.१९ पर्यंत वरील पैकी कृत्ये करू नयेत असे धर्मशास्त्र सांगते. सायं ६.१९ नंतर मोक्ष स्नान करून भोजन आदी नेहमीचे व्यवहार करता येतील.
----------
या भागात दिसेल ग्रहण
भारतासह संपूर्ण आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेच्या पूर्वेकडील प्रदेश व संपूर्ण दक्षिण अमेरिका या प्रदेशात ग्रहण दिसेल. या ग्रहणाचा स्पर्श भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात सर्वत्र ग्रस्तोदित दिसणार आहे म्हणजे ग्रस्त असलेले चंद्रबिंब उदयास येईल, आपल्या गावच्या सूर्यास्तानंतर थोडावेळ हे ग्रहण खंडग्रास दिसेल.
---------
पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे काय?
जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येतात तेव्हा चंद्रग्रहण होते. पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीच्या क्षेत्रातून जातो तेव्हा काही काळासाठी पूर्ण चंद्रग्रहण होते. संपूर्ण चंद्रग्रहणात, चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या गडद सावलीच्या सर्वात गडद भागात येतो. जेव्हा चंद्र सावलीत असतो तेव्हा तो कधीकधी लाल होतो. या घटनेमुळे, चंद्रग्रहणाला ‘ब्लड मून’ असेही म्हटले जाते.