स्वस्त धान्य दुकानातून तूरडाळ झाली गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:39 AM2021-02-06T04:39:46+5:302021-02-06T04:39:46+5:30
स्वस्त किमतीत अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र, ...
स्वस्त किमतीत अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून गरिबांना धान्य पुरवठा केला जातो. मात्र, खुल्या बाजारात महागड्या दराने विकली जाणारी तूरडाळ रेशनमधून मिळेनाशी झाली आहे. सध्या तालुक्यातील ३१९० अंत्योदय कार्डधारक, २३ हजार ८१३ अन्नसुरक्षा पात्र केशरी कार्डधारक, २२ हजार २६१ अन्नसुरक्षा पिवळे कार्डधारक अशा ४९ हजार २६४ शिधापत्रिका धारकांना धान्य दिले जाते.
सध्या फक्त ३ किलो गहू आणि २ किलो तांदळाचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानातून केला जात आहे. सांगोला तालुक्यातील १५५ स्वस्त धान्य दुकानदारांकडे सुमारे ७४ हजार ८८७ हजार शिधापत्रिका धारक आहेत. सद्यस्थितीत गरिबांना खुल्या बाजारातून महागडी तूरडाळ खरेदी करावी लागत आहे. सणासुदीच्या काळात रेशनमधून खाद्यतेल मिळत असे. मात्र तेही आता बंद झाले आहे.
मार्च ते नोव्हेंबर दरम्यान सरकारकडून गहू, तांदूळ, तूरडाळ मोफत मिळाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनाच मोफत धान्य मिळाले. यातून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, मागील दोन महिन्यांपासून मोफत धान्य वाटप बंद झाले आहे. बहुतांश नागरिकांचे रोजगार अद्यापही पूर्वपदावर आले नसल्याने सरकारकडून आणखी काही महिने मोफत धान्य मिळावे अशी मागणी शिधापत्रिका धारकांनी केली आहे.
तालुक्यातील स्थिती
सांगोला तालुक्यात अंत्योदय ३ हजार १९० कार्डधारक (१६ हजार ८७६ युनिट), अन्नसुरक्षा केशरी २३ हजार ८१३ कार्डधारक (१ लाख ५ हजार २१५ युनिट), अन्नसुरक्षा पिवळे २२ हजार २६१ कार्डधारक (१ लाख १ हजार १४० युनिट) अपात्र केशरी १९ हजार १६० कार्ड धारक (८० हजार ६० युनिट), शुभ्र ६ हजार ४६७ (३० हजार ८८१ युनिट) कार्ड धारक असे एकूण ७४ हजार ८८७ कार्डधारक असून ३ लाख ७ हजार ५१६ युनिट संख्या आहे.
------