सुपर मार्केटस्मुळे किराणा व्यवसाय अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:27 PM2018-07-07T12:27:18+5:302018-07-07T12:28:33+5:30
पन्नास टक्के घट : सरकारच्या धोरणाला व्यापाºयांचा विरोध
रवींद्र देशमुख
सोलापूर : केंद्र सरकारने थेट परकीय गुंतवणुकीसाठी सिंगल ब्रँडला परवानगी दिल्यानंतर वॉलमार्ट-फ्लिपकार्टच्या संभाव्य कराराच्या पार्श्वभूमीवर देशात अन्नधान्यापासून अनेक उत्पादने एकाच ब्रँडखाली सुपर मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहेत. या स्थितीत किरकोळ किराणा व्यापाºयांचे कंबरडे पुरते मोडण्याची दाट शक्यता आहे; पण सध्या अस्तित्वातील बिग बझार, डी-मार्टसारख्या भारतीय कंपन्यांच्या सुपर मार्केट जाळ्यामुळे किरकोळ किराणा व्यापार ५० टक्क्यांनी घटला असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
बिग बझार ही कंपनी सन २००१ मध्ये भारतात सुरू झाली. फ्यूचर ग्रुप या पॅरेंट आॅर्गनायझेशनच्या या कंपनीचे देशातील १२० शहरात २५० हून अधिक मॉल्स आहेत. किराणा मालापासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, दागिने आदी वैविध्यपूर्ण उत्पादने बिग बझारच्या सुपर मार्केटस्मध्ये उपलब्ध आहेत. डी-मार्ट ही कंपनी सन २००२ मध्ये सुरू झाली.
या कंपनीच्या सुपर मार्केटमध्येही सर्व प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. महाराष्टÑासह गुजरात, आंध्र, तेलंगणा आणि मध्य प्रदेशात या कंपनीचे १५० अधिक मॉल्स आहेत. सोलापूरसारख्या मध्यम आकारमानाच्या शहरामध्ये गेल्या सहा-सात वर्षांपासून या कंपन्यांचे सुपर मार्केटस् आहेत. वस्तुत: सोलापुरात सुपर मार्केट ही संकल्पना खूप पूर्वीच राबविण्यात आली.
ज्येष्ठ दिवंगत नेते वि. गु. शिवदारे यांनी सुपर बाजार या शीर्षकाखाली असा व्यापार सहकारी तत्त्वावर सुरू केला होता. त्यानंतर साई सुपर मार्केटही ग्राहकप्रिय ठरले. डी - मार्ट आणि बिग बझारच्या आगमनानंतर शहरातील या स्थानिक सुपर मार्केटस्चाही विस्तार झाला.
शहराच्या अनेक भागांमध्ये सुपर मार्केटस्चे जाळे वाढल्यानंतर किरकोळ किराणा दुकानांच्या व्यवसायावर मात्र परिणाम व्हायला लागला. लक्ष्मी मंडईतील किराणा मालाचे व्यापारी सलीम मैंदर्गीकर यांनी सांगितले की, आमच्या मंडईमध्ये किराणा मालाचे तीन मोठे व्यापारी आहेत; पण जसे शहरात मॉल्स सुरू झाले तसा आमचा व्यवसाय घटला आहे.
पूर्वीपेक्षा सध्या केवळ ५० टक्केच व्यापार होतो आहे. अक्कलकोट रस्त्यावरील शशिकला ट्रेडर्सचे रामेश्वर नरोळे यांनीही मोठ्या सुपर मार्केटस्मुळे व्यापारावर परिणाम झाल्याचे मान्य केले. ते म्हणाले की, ग्राहकांना स्किम्स् हव्या असतात. या मोठ्या कंपन्या ‘एकावर एक फ्री’ सारख्या स्किम्स् सहज देऊ शकतात. त्यामुळे ग्राहक तेथूनच माल घेणे पसंत करतो. होटगी रस्त्यावर वीरेश्वर पट्टणशेट्टी यांनी सांगितले की, सिंगल ब्रँडच्या मंजुरीमुळे दुकान चालविणेही मुश्किल होणार आहे. मोठ्या आंतरराष्टÑीय कंपन्यांच्या किरकोळ स्वरूपाच्या व्यापारामुळे भारतातील छोटे किरकोळ व्यापारी संपणार आहेत, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली.
-
सुपर मार्केटस्ना पसंती का?
- एकाच छताखाली वैविध्यपूर्ण उत्पादने उपलब्ध
- खरेदीसाठी भरपूर सवलती
- उत्कृष्ट पॅकिंगमध्ये माल उपलब्ध
- काही सुपर मार्केटस्ची घरपोच सेवा
- अगदी फळे आणि भाज्यांची खरेदी करणे शक्य
- बिग बझारसारख्या मॉलमध्ये धान्य खरेदी करून दळून मिळण्याची सुविधा
-
उद्योग व्यापार मंडळाची बैठक
थेट परकीय गुंतवणुकीसाठी सिंगल ब्रँडला भारतीय उद्योग व्यापार मंडळ आणि ‘फाम’ने (फेडरेशन आॅफ असोसिएशन्स् आॅफ महाराष्टÑ) जोरदार विरोध केला आहे. या मंडळाचे सरचिटणीस आणि ‘फाम’चे उपाध्यक्ष पशुपती माशाळ यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, सुपर मार्केटस्च्या जाळ्यामुळे देशातील किरकोळ व्यापार निम्म्याने घटला आहे.
आता सिंगल ब्रँडला मंजुरी मिळाल्यामुळे सामान्य व्यापाºयांचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या स्थितीत केंद्राच्या निर्णयाला विरोध करण्याच्या उद्देशाने आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी भारतीय व्यापार उद्योग मंडळ आणि ‘फाम’च्या पदाधिकाºयांची ८ जुलै रोजी नवी दिल्ली येथे बैठक होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.