रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सिव्हिलमधील आयसोलेशन वॉर्डामध्ये टीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 03:45 PM2020-04-20T15:45:47+5:302020-04-20T15:50:50+5:30
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय : अधिष्ठाता साधणार रुग्णांशी संवाद
सोलापूर : कोरोना आजाराचा सामना करणारे रुग्ण तसेच संशयित रुग्णांसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल ) टीव्हीची सोय करण्यात येणार आहे. रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी अधिष्ठाता हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.
आयसोलेशन वॉर्डामधील रुग्णांमध्ये अंतर (फिजिकल डिस्टन्स) ठेवले जाते. यामुळे त्यांना कुणाशी संवाद साधता येत नाही. बाहेरदेखील जाता येत नाही. आधीच या आजारामुळे रुग्ण हा घाबरलेला असतो. त्यात कुणाशी बोलता आले नाही तर त्याचा विपरीत परिणाम त्याच्या मानसिकतेवर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी रुग्णाचे मन गुंतविणे गरजेचे असते. हा विचार करून रुग्णालय प्रशासनाने आयसोलेशन वॉर्डामध्ये टीव्ही बसविण्याच्या कामास सुरुवात केली आहे. रुग्णांशी अधिष्ठाता वेळोवेळी बोलून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करणार आहेत. अधिष्ठाता यांच्या कार्यालयातून फ्लू ओपीडीमधील टीव्हीशी जोडणी करण्यात येणार आहे.
राज्यातील काही रुग्णालयांतून रुग्णांनी पलायन केले होते. त्यानंतर त्या रुग्णांना पुन्हा शोधावे लागले होते. त्यामुळे बहुतांश आयसोलेशन वॉर्डांमध्ये टीव्ही बसविण्याची कल्पना समोर आली.
सिव्हिल हॉस्पिटलच्या ए ब्लॉकमध्ये १३ मार्च रोजी फ्लू ओपीडीची सुरुवात करण्यात आली. या ओपीडीमध्ये थर्मल स्कॅनर, हेमोग्राम, पल्स आॅक्सिमीटर, पोर्टेबल एक्स-रे या सुविधा देण्यात येत आहेत. आतापर्यंत या ओपीडीमध्ये तीन हजार ६०० जणांची तपासणी करण्यात आली आहे, तर आतापर्यंत ४४८ रुग्णांना येथे अॅडमिट केले होते.
-----
फक्त मनोरंजनाचे कार्यक्रम दाखविणार
ए ब्लॉकमधील आयसोलेशन वॉर्डामध्ये पाच टीव्ही बसविण्यात येणार आहेत. फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी रुग्ण हे दूर बसत आहेत. त्यामुळे त्यांना टीव्ही दिसणार नाही, म्हणून ६५ इंचाचे पाच टीव्ही येथे लावण्यात येणार आहे. या टीव्हीवर फक्त मनोरंजनात्मक कार्यक्रम, चित्रपट, गाणी दाखविण्यात येणार आहेत. मनोरंजनात्मक कार्यक्रमांमुळे रुग्णांचा वेळही जातो. तसेच मनातील नकारात्मक विचार दूर होण्यास मदतही मिळेल.
-----