खेळामध्ये दहावीला गुणांची सवलत मिळाल्यानंतर पुन्हा बारावीला सवलत मिळणार का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 07:28 PM2022-02-24T19:28:51+5:302022-02-24T19:28:56+5:30
शिक्षक आणि विद्यार्थी संभ्रमात : मुलांना स्पर्धेसाठी पाठवताना क्रीडा कार्यालयाला भेट द्या
सोलापूर : सध्या दहावी आणि बारावीमधील खेळाडू विद्यार्थ्यांना खेळाचे गुण देण्यात यावेत असे परिपत्रक नुकतेच शासनाकडून काढण्यात आले आहे. पण हे गुण काही ठराविकच खेळांतील खेळाडूंना दिले जातात. यामुळे आपल्या पाल्यांना अशा खेळांच्या स्पर्धांना पाठवत असताना त्या स्पर्धा अधिकृत असल्याची माहिती क्रीडा विभागाकडून जरूर घ्यावी, असे आवाहन क्रीडा विभागाकडून करण्यात येत आहे.
विविध स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धा भरवल्या जातात. या स्पर्धांमधून भविष्यात खेळाडू कोट्यातून गुण आणि आरक्षण मिळेल या उद्देशाने काही खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. पण आपण सहभागी होत असलेल्या खेळांना गुण मिळतात का ? याची चौकशी मात्र केली जात नाही. यामुळे अनेक खेळाडू आपल्या खेळामध्ये विभागीय, राज्य, राष्ट्रीय, पातळीवर जाऊनही खेळाचे गुण त्यांना मिळत नाही. यामुळे त्यांचे नुकसान होते. शिवाय अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शैक्षणिक ही गुणवत्ता खालावते. यामुळे मुलांना एखाद्या स्पर्धेला पाठवत असताना पालकांनी त्या स्पर्धेची परिपूर्ण माहिती घ्यायला हवी, याबाबत त्यांनी क्रीडा विभागाकडे चौकशी करावी असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
-----------
आदेश मात्र निघाला...
दरम्यान, मंगळवारी क्रीडा विभागाकडून एक पत्र काढण्यात आले. यात दहावीच्या विद्यार्थ्यांना सातवी आणि आठवीच्या क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन त्यांना गुण द्यावे आणि बारावीतील विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीमधील क्रीडा सहभाग विचारात घेऊन सवलतीचे गुण द्यावे, असे आदेश काढण्यात आले आहेत.
----------
सहभाग घेतल्यास असे मिळतील गुण..
२०१९ च्या परिपत्रकानुसार जर एखाद्या खेळाडूने राष्ट्रीय पातळीवर आपला सहभाग नोंदवला असेल तर त्याला १५ गुण पदक पटकावले असेल तर त्याला २० गुण अशाच प्रकारे राज्यस्तरावर त्याने सहभाग घेतला असेल तर दहा गुण जर पदक पटकावले असेल तर पंधरा गुण असे गुण देण्यात येणार आहे. शिवाय विभागस्तरात सहभागीसाठी ५ आणि प्रावीण्य मिळवले असेल तर १० आणि जिल्हास्तरीय प्रावीण्याला ५ गुण देण्यात येणार आहेत.
दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना खेळाचे गुण देण्याबाबत मंगळवारी आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार अंमलबजावणी होणार आहे. यासाठी खेळाडूंनी शाळेच्या माध्यमातून क्रीडा गुणासाठी अर्ज करावेत तसेच खेळाडूंना स्पर्धेत पाठवत असताना संबंधित खेळाची माहिती पालकांनी क्रीडा विभागाकडून घ्यावी जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही.
- सत्यम जाधव, क्रीडाधिकारी