बारा कलाप्रकार रद्द; कोरोनाची सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवावरही गदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:49 PM2021-08-23T16:49:05+5:302021-08-23T16:49:12+5:30
गर्दी टाळण्यासाठी निर्णय : वैयक्तिक कलागुणांनाच यंदा संधी
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा युवा महोत्सव ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सहा ते आठ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या महोत्सवात सांघिक कलाप्रकार वगळून फक्त वैयक्तिक कलाप्रकार घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूण पाच ठिकाणांहून महोत्सवाचे परीक्षण होणार आहे. विद्यापीठाच्या ललित कला संकुल (संगीत), संगमेश्वर महाविद्यालय (ललित कला), सोनी महाविद्यालय (शास्त्रीय नृत्य), मोहोळ येथील देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय (नकला), वसुंधरा कला महाविद्यालय (वक्तृत्व) या ठिकाणांहून परीक्षण होणार आहे. विद्यार्थी घरी राहूनच कला सादर करणार असून, परीक्षक हे ऑनलाईन पद्धतीने कलाप्रकाराचे परीक्षण करणार आहेत. दरवर्षी २८ कलाप्रकार घेण्यात येतात. यंदा मात्र सांघिक कलाप्रकारांचा समावेश नसल्यामुळे फक्त १६ कलाप्रकार सादर होणार आहेत.
परीक्षक असलेल्या ठिकाणी गरजेची सर्व तांत्रिक यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे. कलाप्रकार पाहण्यासाठी मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात येणार आहे.
----------
त्याच दिवशी निकाल
ज्या दिवशी स्पर्धा होईल त्याच दिवशी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण (जनरल चॅम्पियनशिप) विजेता घोषित करण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण हे काही मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. बक्षीस वितरणाची तारीख अद्याप ठरली नसून शासनाच्या नियमाप्रमाणे त्या दिवशीची परिस्थिती पाहून हा निर्णय होईल.
कोरोनामुळे विद्यार्थ्यांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले आहे. युवा महोत्सवामुळे त्यांच्यात उत्साह निर्माण व्हावा, या उद्देशाने ऑनलाईन पद्धतीने महोत्सव घेणार आहोत. महोत्सव अधिक चांगला होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घ्यावा.
- डॉ. वसंत कोरे, संचालक, विद्यार्थी विकास मंडळ