दररोज सलग बारा तास अभ्यासामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 05:29 PM2019-08-05T17:29:39+5:302019-08-05T17:32:08+5:30
माझी प्रयोगशील शाळा...शिक्षणाचा सोलापुरी पॅटर्न; उमाबाई श्राविका शाळेचा प्रयोगशील उपक्रम
सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सलग १८ तास अभ्यास करत होते. त्यांच्याकडून मिळणाºया प्रेरणेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनेक सामाजिक संस्था, संघटना सलग १८ तास अभ्यास करण्याबाबत उपक्रम घेतात. उमाबाई श्राविका शाळेमध्ये फक्त त्याच दिवशी असा उपक्रम न घेता ६ डिसेंबर ते दहावीच्या परीक्षा संपेपर्यंत हा उपक्रम घेण्यात येतो.
यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढली आहे. राज्यात दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असताना उमाबाई श्राविका शाळेचा दहावीचा निकाल हा ९५ टक्के लागला आहे. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून १२ तास अभ्यास उपक्रमाची सुरुवात करण्यात येते. शाळेतील तिन्ही तुकडीचे मिळून १६३ विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतात. अभ्यास सुरू असताना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक समोर असतात. विद्यार्थ्यांना शंका असल्यास लगेच शिक्षकांकडून त्याचे निरसन करण्यात येते. दर दोन तासाला शिक्षक बदलतात. सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हा उपक्रम घेण्यात येतो.
विद्यार्थ्यांना कंटाळा येऊ नये म्हणून त्यांना दुपारी जेवणाची मोठी सुट्टी देण्यात येते. दुपारी चार ते पाच असा एक तास क्रीडाशिक्षक मनोरंजनात्मक खेळ घेतात. त्यानंतर पुन्हा सायंकाळी पाच ते सातपर्यंत अभ्यास केला जातो. सायंकाळी सात वाजता मुलांना नेण्यास त्यांचे पालक येतात. या उपक्रमास पालकांचे सहकार्य असल्याने यास यश मिळत आहे.
दप्तराचे ओझे कमी होण्यासाठी प्रत्येक वर्गात पुस्तकासाठी कपाट ठेवण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून प्रत्येक वर्ग हा ई-क्लास करण्यात आला आहे. प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विषयाची माहिती दिली जाते. संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा विद्युल्लता शहा, संस्थेचे सचिव हर्षवर्धन शहा व विश्वस्त हे विविध उपक्रम राबविण्यासाठी मार्गदर्शन करतात.
आचार्य शांतीसागर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
- उमाबाई श्राविका संस्थेत ६० वर्षांपासून दरवर्षी स्वर्गीय आचार्य शांतीसागर महाराज स्मृतिदिनानिमित्त शांतीसागर वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. हा उपक्रम अखंडपणे चालू आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून प्रशालेत दररोज पुस्तकाचे प्रकट वाचन घेतले जाते. त्याचबरोबर त्यांना संस्कारक्षम गोष्टी सांगितल्या जातात. स्व. हिरुबाई नेमचंद मुक्तद्वार ग्रंथालयामार्फत ‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जातो.
आज स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थी सक्षमपणे ज्ञान संपादन करून समाजातील एक सुसंस्कारीत नागरिक घडविण्याचे पवित्र कार्य आमची शाळा व शिक्षक करत आहेत. नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यामध्ये आमची प्रशाला नेहमी अग्रेसर असते. आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव व्हावा, हा प्रशालेचा मानस आहे.
- प्राचार्य सुकुमार मोहोळे
उमाबाई श्राविका माध्यमिक विद्यालय, सोलापूर.