३० वॉटर व्हेंडिंग मशीनव्दारे १२ हजार रेल्वे प्रवासी पितात रोज पाऊण लाखाचं पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 12:26 PM2018-08-28T12:26:14+5:302018-08-28T12:30:51+5:30
शुद्ध पाण्याची गोडी : विभागात रेल्वे स्थानकांवर बसवले ३० वॉटर व्हेंडिंग मशीन
काशिनाथ वाघमारे
सोलापूर : खानपान आणि रेल्वे प्रवास या दोन गोष्टी जीवनात पक्क्या ठरलेल्या आहेत़ एकेकाळी रेल्वे स्थानकावर नळाने होणाºया पाणी पुरवठ्याची जागा आता वॉटर व्हेंडिंग मशीनने घेतली आहे़ केवळ ‘पाच रुपये क्वाईन टाका, बाटलीभर शुद्ध पाणी मिळवा’ हा संदेश आता प्रत्येक प्रवाशापर्यंत पोहोचला आहे़ परिणामत: विभागात दररोज १२ हजार प्रवाशांना किमान ६० हजार रुपयांचे पाणी पाजले जात आहे़ याबरोबरच सार्वजनिक नळावर अवलंबून असणाºया प्रवाशांनाही आता शुद्ध पाण्याची गोडी लागली आहे
सोलापूर विभागात सोलापूरसह नगर, सांगली, दौंड, उस्मानाबाद, लातूर, गुलबर्गा आदींचा समावेश आहे़ या विभागातून दररोज शंभराहून अधिक गाड्या धावतात़ मोठ्या स्थानकांवर काही लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात़ यातील गरीब आणि मध्यम वर्गाचा पाच रुपयांत उपलब्ध होणाºया पाण्याकडे कल आहे़ उच्च वर्गातील प्रवासी हा बाटलीबंद पाण्यावर अवलंबून आहे़
सोलापूर स्थानकावर प्लॅटफॉर्म एकवर दोन मशिन्स, दोन-तीन नंबर प्लॅटफॉर्मवर तीन मशिन्स, चार-पाच क्रमांकाच्या प्लॅटफ ॉर्मवर दोन मशिन्स बसविण्यात आले आहे़ मागील काही दिवसांत जनरल तिकीट केंद्राजवळ एक मशीन नव्याने बसवली गेली आहे़
मध्यम, गरीब वर्गाचा कल
- सोलापूरसह विविध रेल्वे स्थानकांवर गेल्या वर्षभरात वॉटर व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहे़ पहिल्या टप्प्यात दौंड, कुर्डूवाडी स्थानकावर त्यानंतर सोलापूर स्थानकावर या मशिन्स बसविण्यात आल्या आहेत़ वर्षभरात बहुतांश स्थानकांवर मशिन्स बसविण्यात आल्या आहेत़ तत्पूर्वी मध्यम आणि गरीब वर्ग हा स्थानकावरील नळावर पाणी पित होता़ आता स्थानकावरील स्टॉलवर पाण्याची बाटली १२ ते १५ रुपयांत उपलब्ध होते़ हीच सेवा आणखी स्वस्तात देण्याच्या हेतूने मागील वर्षी स्थानकावर सरळ मशीन बसविण्याचा निर्णय घेतला गेला़
- सोलापूर स्थानकावर एकूण ८ मशिन्स बसविण्यात आल्या आहे़त़ प्रवाशांना स्वस्तात आणि तत्काळ पाणी उपलब्ध व्हावे म्हणून ही या वॉटर व्हेंडिंग मशिन्स बसविण्यात आले आहेत़़ विभागात जवळपास ३० मशिन्स गेल्या वर्षभरात बसवल्या गेल्या आहेत़ मशीनमधील वॉटर प्युरीफायरची सातत्याने देखभाल घेतली जाते़ प्रवाशांनाही शुद्ध पाण्याची सवय जडत आहे़ परिणाम चांगला दिसून येतोय़
- आऱ के़ शर्मा, विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक