पावसाने भिजलेला वीस ट्रक कांदा सडला, विक्रीविना पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:22 PM2019-11-07T14:22:36+5:302019-11-07T14:25:19+5:30
सोलापूर बाजार समिती; नासलेल्या कांद्याची सोलापूर बाजार समितीत दुर्गंधी
सोलापूर : पावसाने भिजलेला कांदा घाईघाईने विक्रीसाठी आणला जात आहे; मात्र असा कांदा नासू लागल्याने विक्री होत नाही. अशा १५ ते २० ट्रक कांद्याची विक्रीच बुधवारी झाली नाही. भिजलेल्या कांद्याला अल्पसा दर मिळत असल्याने शेतकºयांना हात हलवत परत जावे लागत आहे.
सध्या चांगल्या कांद्याला सोलापूर बाजार समितीत चांगला दर मिळत आहे. जुन्या व यावर्षीच्या गुणवत्तेच्या कांद्याला राज्यात सर्वाधिक दर सोलापूर बाजार समितीत मिळत आहे. असे असल्यानेच शेतकºयांनी कांदा विक्रीसाठी आणण्याची एकच घाई सुरू केली आहे; मात्र कांदा पिकात पाणी व काढणीनंतरही पाऊस पडत असल्याने कांदा खराब होत आहे. यातील बरा वाटणारा कांदा शेतकरी विक्रीसाठी आणत आहेत; मात्र काढणी केलेला कांदा वाळण्यासाठी टाकला की पाऊस येतो व झाकावा लागतो. हा कांदा पोत्यात भरून वाहनाने सोलापूरला आणल्यानंतर उतरताना आदळ-आपट होते. याशिवाय पोत्यात भरल्यानंतर गुदमरुन कांदा खराब होतो. असा खराब झालेला कांदा बाजार समितीत खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नाहीत.
मंगळवारी व बुधवारी अशा १५ ते २० ट्रक कांद्याची विक्री झाली नाही. काही कांद्याची विक्री झाली; मात्र खरेदीदारांनी कांदा उचललाच नसल्याचे सांगण्यात आले. कांदा शेडमध्ये विविध ठिकाणी पडलेला दिसून आला. काही शेतकरी विक्री न झाल्याने कांदा परत घेऊन गेले.
विक्री झाली नसल्याने कांदा गावाकडे..
सातोले (ता. करमाळा) येथील एका तीन एकरातील काढलेला २२५ पिशवी कांदा सोलापूर बाजार समितीत विक्रीसाठी आणला होता; मात्र हा कांदा विक्रीच झाला नाही. हा कांदा शेतकºयाने परत नेला. कांदा लागणीपासून बाजार समितीतून परत घेऊन जाईपर्यंत दीड लाख रुपये खर्च झाल्याचे त्या शेतकºयाने सांगितले.
दोन एकर कांदा लागवड केली होती. त्यापैकी एक एकर कांद्याची काढणी केली. निवडून चांगला आहे असा २० पिशव्या कांदा विक्रीसाठी आणला. कांदा पिकासाठी संपूर्ण कुटुंब राबले व इतर १० हजार रुपये खर्च झाला. अल्पसा दर मिळाल्याने खर्चही निघाला नाही.
- सुधाकर शिंदे, शेतकरी ढवळस
दीड एकर कांदा काढणीनंतर चांगला म्हणून ५० पिशव्या निघाल्या. त्या तीन दिवस उन्हात टाकून विक्रीसाठी आणल्या. भाडे, हमाली, कांदा काढणी व कांदा जोपासण्यासाठी केलेला खर्चही निघाला नाही. कुटुंब चालवायचे कसे?,हा प्रश्न आहे.
- शिवाजी ठोंबरे,
शेतकरी ढवळस
पावसात भिजलेला कांदा विक्री होत नाही. तो नासून जातोे. असा कांदा शेतकºयांनी विक्रीसाठी आणू नये. पोत्यात भरताना चांगला दिसणारा कांदा बाजार समितीत येईपर्यंत खराब होतो. शेतकºयांनी काढणीपासूनचा खर्च करून कांदा विक्रीसाठी आणू नये.
- केदार उंबरजे, अडते