दोनशे बटूंना अय्याचार, शिवदीक्षा
By Admin | Published: June 10, 2014 12:58 AM2014-06-10T00:58:53+5:302014-06-10T00:58:53+5:30
जंगम समाजाचे आयोजन : जगद्गुरूंचे सान्निध्य
सोलापूर : जंगम समाजातर्फे आज येथे दोनशे बटूंना अय्याचार आणि शिवदीक्षा देण्यात आली. यावेळी उज्जयिनी पीठाचे जगद्गुरू श्री सिद्धलिंगस्वामी शिवाचार्य महास्वामीजी, काशी पीठाचे जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे दिव्य सान्निध्य लाभले.
बृहन्मठ होटगी संस्थानच्या चन्नवीर मंदिरातील ध्यान मंदिरात हा भव्य सोहळा झाला. यावेळी माळकवठा, गौडगाव, मंद्रुप, नागणसूर, मैंदर्गी येथील बटूंना होटगी मठातील शिवाचार्यांनी शिवदीक्षा दिली. वेदमूर्ती शिवयोगी, होळीमठ, वेदमूर्ती बसवराजशास्त्री हिरेमठ, वेदमूर्ती नागनाथशास्त्री यांनी या विधीचे पौरोहित्य केले.
यावेळी उज्जयिनी पीठाचे जगद्गुरू महास्वामीजी म्हणाले, सद्गुरूकडून दिलेला मंत्रादेश व्यक्तीचे ऐहिक, पारमार्थिक जीवन सुख, शांती, समाधानी करून देतो. वीरशैवांमध्ये गर्भात असलेल्या मांस पिंडास आठव्या महिन्यात मंत्रोपदेश देऊन लिंगधारणा करतात. याच्या समर्थनात महाभारतातील भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीस सांगितलेली कथा गर्भस्थ अभिमन्यूने कशी ऐकली, चक्रव्यूहातून ज्ञान त्याला कसं झालं, हे महास्वामीजींनी कथन केले. महास्वामीजींनी मोठ्या संख्येने बटूंनी शिवदीक्षा घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, वीरशैव धर्माचे गुरूस्थानी असणाऱ्या जंगमांनी सुसंस्कारी असणं गरजेचे आहे. त्यासाठी अय्याचार विधी हा महत्त्वाचा संस्कार असून, त्यानुसार त्यांनी सदाचरणी राहत समाजाला मार्गदर्शन केले पाहिजे.
हा समारंभ यशस्वी होण्यासाठी होटगी संस्थेचे कार्यकारी संचालक कुंभार, सचिव शांतय्या स्वामी, डॉ. राजशेखर हिरेमठ यांचे सहकार्य लाभले. प्रारंभी सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी प्रास्ताविक केले. राजा कंदलगावकर यांनी आभार मानले.
-----------------------
देखणा सोहळा
सोलापूर जिल्ह्यातील बटूंवर धार्मिक संस्कार करण्यासाठी आयोजित केलेला अय्याचार व शिवदीक्षा सोहळा अत्यंत देखणा होता. छोटे बटू शिस्तीत एका रांगेत बसलेले होते. त्यांचे तेजस्वी रूप सर्वांना भारून टाकत होते. जगद्गुरूंच्या साक्षीने झालेला हा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.