विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना लिपिकासह दोघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 11:42 AM2021-01-28T11:42:44+5:302021-01-28T11:42:46+5:30
महानगरपालिकेतील प्रकार : सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली फिर्याद
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेमध्ये विवाह नोंदणी करण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिकासह दोघांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.
कनिष्ठ लिपिक सलाउद्दीन सरफोद्दीन शेख, मजूर मनोज प्रकाश पाटोळे असे पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदाराने दि. २५ जानेवारी रोजी विवाह नोंदणीसाठी सोलापूर महानगरपालिकेमध्ये अर्ज दिला होता. तेव्हा दोघांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली.
तक्रारदाराच्या तक्रारीवरून बुधवारी सापळा रचण्यात आला होता. तक्रार पाचशे रुपये देताना महानगरपालिकेच्या लिपिक व मजूर दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संजीव पाटील, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, हवालदार बानेवाले, महिला पोलीस नाईक अर्चना स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील संन्नके, उमेश पवार, श्याम सुरवसे यांनी पार पडली.