विवाह जमविणाऱ्या महिलेने पळविले अडीच लाखांचे दागिने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:20 AM2021-04-14T04:20:48+5:302021-04-14T04:20:48+5:30
वैराग : जामगाव (ता. बार्शी) येथे मध्यस्थी होऊन लग्न जमविणाऱ्या महिलेने कुटुंबप्रमुख आजारी असल्याचा गैरफायदा घेत अडीच ...
वैराग : जामगाव (ता. बार्शी) येथे मध्यस्थी होऊन लग्न जमविणाऱ्या महिलेने कुटुंबप्रमुख आजारी असल्याचा गैरफायदा घेत अडीच लाखांचे दागिने पळविले.
याप्रकरणी
लताबाई लक्ष्मण हिंगे या महिलेविरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पाेलीस सूत्रांकडील माहितीनुसार फिर्यादी गोपाळ पाटील यांचा मोठा भाऊ कृष्णा याचे लग्न लताबाई हिंगे हिने मध्यस्थीने तिच्या नात्यातील घाणेगाव (ता. बार्शी) येथील मुलीशी जमविले होते. मे महिन्यात लग्न ठरले होते. त्यामुळे लताबाईचा घरात वावर वाढला होता, तसेच लग्नासाठी तिच्या समक्षच दागिने खरेदी करण्यात आले होते.
दरम्यान, वडिलांना मधुमेहाचा आजार बळावल्याने त्यांना बार्शी येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्यांच्यासोबत आई थांबली व गावी गोपाळ एकटाच होता म्हणून लताबाईने त्यास दररोज डबा देण्याची जबाबदारी स्वत:हून स्वीकारली. दररोज स्वत: जेवणाचा डबा घरपोहोच करी. काही वेळा बाहेर जात असल्याने विश्वासात घेऊन, घराची चावी माझ्याकडे दे... मी स्वत: कुलूप उघडून घरात डबा ठेवेन... म्हटले. दरम्यान, लग्नाची तयारी करण्यासाठी आई बॅग आवरत असताना तिला त्यातील सोन्याच्या तीन तोळ्याच्या पाटल्या, दोन तोळ्याचे लॉकेट, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, असा एकूण सुमारे अडीच लाखांचा ऐवज गायब झाल्याचे निदर्शनास आले. सर्वत्र शोध घेतला. बॅगेत ठेवलेले दागिने लताबाईला माहीत होते. वडील दवाखान्यातून परतल्यानंतर तिने घरी येणे बंद केले. त्यामुळे तिच्यावर संशय बळावल्याने तिनेच विश्वासघाताने दागिने चोरून नेल्याची फिर्याद गोपाळ पाटील यांनी दिली आहे.