फेसबुकवर आवडलेली ट्रॉली खरेदीसाठी आलेल्या तरुणांना अडीच लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:16 AM2021-07-01T04:16:29+5:302021-07-01T04:16:29+5:30
याबाबत अरविंद पुरुषोत्तम बुकन (वय ३१, रा. बुकनवाडी, जि. उस्मानाबाद) यांच्या फिर्यादीवरून कोयल शिंदे याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा नोंदला ...
याबाबत अरविंद पुरुषोत्तम बुकन (वय ३१, रा. बुकनवाडी, जि. उस्मानाबाद) यांच्या फिर्यादीवरून कोयल शिंदे याच्याविरुद्ध कुर्डुवाडी पोलिसांत गुन्हा नोंदला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अरविंद बुकन यांना शेती व्यवसायासाठी ट्रॅक्टर-ट्राॅली हवी होती. बुकन यांनी फेसबूकवरील ट्रॅक्टर खरेदी - विक्री ग्रुप सोलापूर यावर टाकलेले फोटो पाहून, दिलेल्या मोबाईल नंबरवर २४ जून रोजी फोन करून दोन ट्राॅल्या खरेदी करण्यासाठी विचारणा केली. यावर किमतीचे नंतर बघू, येताना अडीच-तीन लाख रुपये घेऊन या, असे समोरील व्यक्तीने सांगितले. कुठे यायचे असे विचारले असता, कुर्डूवाडीच्या पुढे चार कि.मी.वर कुर्डू गाव आहे, तेथे येण्यास सांगितले.
दरम्यान, २९ रोजी फिर्यादीने सकाळी ९.३० च्या सुमारास मिळालेल्या नंबरवर फोन करून ट्राॅली खरेदीसाठी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी, त्याचा मित्र सौरभ महादेव जाधव व ड्रायव्हर कुमार बोरे हे दुपारी तीनच्या सुमारास कुर्डू येथे आले. त्यावेळी त्यांना चौकातील एका हाॅटेलवर येण्यास सांगितले. त्याने त्याचे नाव कोयल शिंदे व त्याच्यासोबत असलेला व्यक्तीचे नाव महेश शिंदे असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी फिर्यादीला किती पेमेंट आणले, असे विचारले. त्यावर फिर्यादीने दोन-अडीच लाख रुपये आणल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी ट्राॅल्या संपल्या आहेत, ट्राॅल्या आल्या की मी तुम्हाला कळवतो, असे म्हटले. त्यानंतर फिर्यादीने, ठीक आहे आम्ही जातो असे म्हणून त्यांच्या चारचाकी गाडीतून (नं. एमएच १४ इसी १७७०) ते उस्मानाबादकडे निघाले. यानंतर आरोपींनी काही अंतरावर वाहन गेल्यानंतर पाठलाग करून ट्रॉली खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींकडून जबरदस्तीने अडीच लाख रुपये घेऊन पळ काढला.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे करीत आहेत.
----
अन् अडीच लाख घेऊन पळाले
ट्रॉली शिल्लक नसल्याने वाहनातून आलेले तिघे परत निघाले. काही अंतरावर कुर्डू रस्त्यावरील एका मंगल कार्यालयासमोर सायंकाळी साडेचारच्या सुमारास आईस्क्रिम खाण्यासाठी थांबले. तोच पाठीमागून कुर्डू येथे भेटलेल्या दोन व्यक्ती व एक व्यक्ती आणि महिला यांनी हातात दगड घेऊन पैसे द्या, असे म्हणून जबरदस्तीने गाडीच्या समोरील बाजूस डिक्कीत ठेवलेले पैसे काढून घेतले. कोयल शिंदे याने ज्योती पळ, कुकण्या पळ असे म्हणत, दोन दुचाकीवरून ते पळून गेले. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
...............