पाच घरफोड्या करणाऱ्या दोन अट्टल चोरांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:16 AM2021-06-26T04:16:53+5:302021-06-26T04:16:53+5:30
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सूर्यकांत कोंडावार (वय ४७, रा. नागालँड हॉटेल पाठीमागे, वांगीकरनगर, पंढरपूर) हे १७ फेब्रुवारी २०२१ रोजी ...
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनिल सूर्यकांत कोंडावार (वय ४७, रा. नागालँड हॉटेल पाठीमागे, वांगीकरनगर, पंढरपूर) हे १७ फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कुटुंबातील सर्व सदस्यांसह तिरुपती बालाजी येथे देवदर्शनासाठी गेले होते.
ते गावावरून परत आले, त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाच्या कोयंडा कापून कोणी तरी चोरी केली असल्याचे समजले.
चोरांनी १० ग्रॅम वजनाची सोन्याची खरबुजी मण्याची दोनपदरी माळ, साडेतीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील टॉप्स, ४.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे प्रेसचे कानातील जोड, ३६ ग्रॅम वजनाचे चांदीचे ब्रासलेट, ५२ ग्रॅम वजनाचे चांदीचे फुलपात्र, १९८ ग्रॅम वजनाचा चांदीचा कलश, ६७ ग्रॅम वजनाची चांदीची गणपती मूर्ती, ३२ ग्रॅम वजनाची चांदीची पळी, २५५ ग्रॅम वजनाचे चांदीचे ताम्हण, २६ ग्रॅम वजनाची चांदीची वाटी, ५० ग्रॅम वजनाचे दोन चांदीचे निरंजन, ३० ग्रॅम वजनाचे चांदीचे कमल निरंजन, १० ग्रॅम वजनाची चांदीची लहान वाटी, ३० ग्रॅम वजनाचे चांदीचे जास्वंदी फूल, एक गडू, फुलपात्र, दुर्वा, मोदक, ६१ हजार रोख रक्कम असा एकूण १ लाख ४३ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी अनिल सूर्यकांत कोंडावार यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोनि. अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजेंद्र मगदूम यांनी तपसाची चक्रे फिरवत अजय अंकुश काळे (रा. कैकाडी महाराज मठाशेजारी, पंढरपूर) व आदर्श दत्तात्रय चव्हाण (रा. विस्थापितनगर, पंढरपूर) या दोघांना ताब्यात घेतले. त्या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. चौकशीदरम्यान त्यांनी यापूर्वी आणखी चार घरफोड्या केल्या असल्याची माहिती समोर आली. पुन्हा न्यायालयाने त्या दोघांना एक दिवस पोलीस कोठडी सुनावली. त्यांच्याकडून ४७ हजार ५८० रुपयांच्या सोन्याच्या व चांदीच्या विविध वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि. राजेंद्र मगदूम, पोहेकॉ. शरद कदम, सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, पोना. शोएब पठाण, इरफान शेख, महेश पवार, पोकॉ. सुनील बनसोडे, सुजित जाधव, समाधान माने, विनोद पाटील यांनी केली आहे.