वाळू तस्करीत गुंतलेल्या दोन बोटी सोलापुरच्या महसूल विभागाने जाळल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:31 PM2018-12-08T20:31:32+5:302018-12-08T20:32:42+5:30
भीमा नदी पात्रात झाली; कारवाई दोन बोटी पळून जाण्यात यशस्वी
सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथील भीमानदी पात्रातून वाळू उपसा करणाºया दोन बोटी सोलापूरच्या महसूल विभागाने शनिवारी जाळल्या.
महसूल अधिकारी, दक्षिण तालुका व अक्कलकोट तालुक्यातील कर्मचारी यांच्या संयुक्त पथकने ही कारवाई केली. ही कारवाई लक्षात येताच दोन बोटी घेवून तस्कर पळून गेल्याने त्या मात्र वाचल्या. या कारवाईत ८ लाखाच्या बोटी नष्ट केल्या असून ४ लाखांचा वाळूसाठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच ते सायंकाळी पाच या वेळेत ही कारवाई करण्यात आली.
तडवळ परिसरातील शेगाव हे वाळू तस्करीसाठी चर्चेत असलेले गाव आहे. मागील काही दिवसांपासून येथे वाळू चोरी मोठ्या प्रमाणात वाढली होती. या संदर्भात आलेल्या तक्रारींची दखल घेवून ७ डिसेंबरला भल्या पहाटे ही कारवाई केली. बोटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न होताच तस्करांनी दोन बोटी पाण्यात बुडवून कर्नाटक हद्दीत पळवून नेल्या. मात्र प्रत्येकी ४ लाख रुपये किंमतीच्या दोन बोटी या पथकाच्या हाती लागल्या. त्यांनी त्या जिलेटीन लावून नष्ट केल्या.
या भागातील वाळू तस्करीला मदत करण्यात मंगरूळ आणि डोंबरजवळगे तलाठी व रेकॉर्ड रूम मधील एक कोतवालाचा पुढाकार असायचा, अशी माहिती आहे. अक्कलकोट तहसील कार्यालयात वाळू तस्करी विरोधी पथक कार्यरत असताना सोलापुरातील अधिकाºयांनी ही कारवाई केली. त्यामुळे अक्कलकोटच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.