सोलापूर जिल्हा बँकेत एका दिवसात जमा झाल्या दोन कोटींच्या ठेवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 01:27 PM2018-03-09T13:27:35+5:302018-03-09T13:27:35+5:30
वैराग शाखेचा विक्रम: सर्वाधिक २५ लाख रुपयांच्या ठेवी जमा
सोलापूर: बँक कर्मचारी व सचिवांनीच पुढाकार घेतल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुरुवारी एकाच दिवसात दोन कोटींपेक्षा अधिक ठेवी जमा झाल्या. बँकेच्या शतक महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त ३० मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर ठेवी वाढतील असे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले.
बँकेच्या मुख्यालयासह जिल्हाभरातील २१९ शाखांमध्ये ठेवी ठेवण्यासाठी कर्मचाºयांनीच पुढाकार घेतला असल्याचे बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी सांगितले. कर्मचारी व विकास सोसायट्यांच्या सचिवांनी स्वत:च्या कुटुंबातील महिला, सुना, मुले व नातेवाईकांच्या नावाने ठेवी ठेवाव्यात तसेच बचत खाती उघडावीत असे कर्मचाºयांनीच आवाहन केले.
८ मार्च महिला दिन तसेच बँकेने शतक पूर्ण केल्याने गुरुवारी सर्वच शाखात ठेवी ठेवणे व बचत खाती उघडण्याचे काम दिवसभर सुरू होते. बँकेच्या मुख्यालयात सरव्यवस्थापक किसन मोटे यांनी कुटुंबातील चौघांच्या नावे बचत खाती उघडली. मुख्यालयातील अनेक कर्मचाºयांनी ठेवी व बचत खाती सुरू केली. वैराग शाखेत २५ लाख रुपयांच्या ठेवी जमा केल्या, बार्शी मार्केट यार्ड शाखा, पेनूर शाखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा बँक थकबाकीमुळे अडचणीत आली होती. वसुलीसाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत, कर्जमाफीमुळे बºयापैकी शेतकºयांकडील वसुली होणार असल्याने शेतकºयांना नव्याने कर्ज वाटप होणे गरजेचे आहे. बँक आता नव्या जोमाने कर्ज वाटप करणार असल्याने त्यासाठी पैशाची गरज असल्याने ठेवी वाढविण्याचे कर्मचाºयांनीच मनावर घेतल्याचे बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी सांगितले. बँकेचा शतक महोत्सवी वर्धापन दिन कार्यक्रम ३० मार्चला होणार असून तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर ठेवी वाढतील असे त्यांनी सांगितले. यापुढेही ठेवी व बचत खाती उघडण्याचे काम सुरू राहील असे यांनी सांगितले.