कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शंभरात दोघांचा मृत्यू; सोलापुरातील चाचण्या २१ लाखांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 12:41 PM2021-09-21T12:41:34+5:302021-09-21T12:42:57+5:30
चाचण्या २१ लाखांवर : बाधितांची संख्या दीड लाख
सोलापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मृत्युदर पहिल्या लाटेपेक्षा कमी म्हणजे २.१० टक्के इतका राहिला आहे. बाधितांची संख्या मात्र दीड पटीने वाढल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात २६ एप्रिल २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात कोरोनाची पहिली लाट येऊन गेली. या काळात ७ लाख १७ हजार १०२ संशयित नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ५२ हजार २७९ जण बाधित आढळले. चाचण्याच्या प्रमाणात बाधितांची संख्या ७.२९ टक्के इतकी आहे. यातील १ हजार ८४४ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाण ३.५३ टक्के इतके आहे. यातील ५० हजार ३२९ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनातून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२७ टक्के राहिले आहे.
१ मार्च ते १६ सप्टेंबर हा कालावधी दुसऱ्या लाटेचा गृहीत धरल्यास या काळात बाधितांच्या प्रमाणात दीडपट वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या काळात २१ लाख ६५ हजार २७७ संशयितांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात १ लाख ४६ हजार ०९९ जण बाधित आढळले. चाचण्यांच्या प्रमाणात बाधितांची संख्या ६.७५ टक्के इतकी आहे. यात ३ हजार ७३ जणांचा मृत्यू झाला. तरीही, बाधितांच्या प्रमाणात मृत्यूची टक्केवारी २.१० इतकी आहे. १ लाख ४१ हजार २०३ जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्त होण्याचे हे प्रमाण ९६.६५ टक्के इतके आहे.
६.८८ टक्के बाधित
साथीचा आतापर्यंतचा आढावा घेतल्यास २८ लाख ८२ हजार ३७९ चाचण्या झाल्या. यात १ लाख ९८ हजार ३७८ जण बाधित आढळले. एकूण चाचण्यांच्या प्रमाणात बाधितांची संख्या ६.८८ टक्के इतकी आहे. यातील ४ हजार ९१७ जणांचा मृत्यू झाला. मृत्यूची टक्केवारी २.४८ टक्के इतकी आहे. १ लाख ९१ हजार ५३२ जण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५५ टक्के इतके आहे.