देवीचे दर्शन करून घराकडे निघालेले कोल्हापुरातील दोन भाविक अपघातात ठार, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 09:38 AM2024-10-07T09:38:13+5:302024-10-07T09:38:55+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या कार मधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते
- अरुण लिगाडे
सांगोला : तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन गावाकडे परत जाताना भाविकांची भरधाव वेगाने जाणारी कारने पाठीमागून मालट्रकला जोराची धडकून भीषण अपघातात दोघेजण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास सोलापूर - सांगली महामार्गावरील चिंचोली बायपास (ता. सांगोला) येथे घडला. अपघातातील मृत व जखमी कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
सुखदेव बामणे (४०) व नैनेश कोरे (३१ दोघेही रा. नांदणी जि. कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत तर अनिल शिवानंद कोरे (४२, रा.नांदणी), सुधीर चौगुले (३५ रा.वडगाव), सुरज विभुते (-२१ रा.कोठली) हे तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सांगोल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्ग पोलीस पथक व सांगोला पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तकार रोडवरुन बाजूला काढून जखमींना उपचार करता तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले.
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी व वडगाव येथील पाच मित्र मिळून रविवारी एम एच -०९ एफबी-३९ ०८ या कार मधून तुळजापूर येथील नवरात्रीनिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी गेले होते, दर्शनानंतर त्याच कारमधून पाचजण सोलापूरकडून हायवेने नांदणी जि. कोल्हापूर गावाकडे निघाले होते. वाटेत सांगोल्याजवळील चिंचोली बायपास वर त्यांच्या भरधाव कारची पाठीमागून डाळिंब घेऊन जाणाऱ्या १६ चाकी एम पी -२० झेड एम -९५१८ या माल ट्रकला जोराची धडक बसून हा भीषण अपघात घडला.
अपघात इतका भीषण होता की, कार मधील दोघेजण उडून बाहेर फेकल्याने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता तर चालक कार मध्ये अडकून पडल्याने पोलिसांनी त्याला बाहेर काढून मदत केली.