वागदरीतील दुर्घटनेत दोघांचा मृत्यू; आज, उद्या होणारे धार्मिकसह सर्व कार्यक्रम रद्द
By Appasaheb.patil | Published: March 27, 2023 03:20 PM2023-03-27T15:20:03+5:302023-03-27T15:21:01+5:30
वागदरी (ता. अक्कलकोट) येथील परमेश्वर यात्रेत रथाचे चाक निखळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: वागदरी (ता. अक्कलकोट) येथील परमेश्वर यात्रेत रथाचे चाक निखळल्याने झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मंदिर समिती व पंचकमिटीचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आज, उद्या होणारे सर्व धार्मिक, कुस्ती फड व अन्य कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
वागदरी ग्रामदैवत श्री परमेश्वर यात्रा अक्कलकोट तालुक्यात लक्षवेधी असते. सालाबादप्रमाणे यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत दोन दिवसांपसून सुरू होती. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता रथोत्सवास प्रारंभ झाला. जाताना मिरवणूक शिस्तबद्ध पद्धतीने गेली. परतीच्या वेळी अचानकपणे पार तुटला. तेव्हा रथ तीन चाकांवर जागेवरच थांबला. यात्रेत मोठी गर्दी होती. त्या गर्दीत इरप्पा नंदे व गंगाराम मंजुळकर हे दोघेही निखळलेल्या चाकाखाली सापडले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने गावावर शोककळा पसरली. त्यानंतर यात्रेतील सर्व धार्मिक विधी त्याचवेळी थांबविण्यात आले. सोमवारी सकाळी ग्रामस्थांनी आज व उद्या होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक महेश स्वामी हे करीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"