पाण्यासाठी गेलेल्या दोघा ऊसतोड मजुरांचा विहिरीत बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 12:48 PM2020-03-11T12:48:24+5:302020-03-11T12:52:16+5:30
भेंड (ता. माढा) येथील घटना; एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आले यश, दुसºयाचा शोध सुरू
कुर्डुवाडी : पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोघां ऊसतोड मजुरांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास भेंड (ता़ माढा) येथे घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, माढा तालुक्यातील भेंड येथील शैलेश भारत दोशी यांच्या गट क्रमांक १९१ च्या हद्दीतील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले एक ऊसतोड मजूर गेला होता़ त्यावेळी विहिरीत खाली उतरत असताना अचानक पाय घसरला अन् तो पाण्यात पडला़ पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडत होता़ त्याला वाचविण्यासाठी दुसºया ऊसतोड मजूराने प्रयत्न केला मात्र त्याचाही पाय घसरल्याने तोही पाण्यात पडला़ त्यामुळे दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बुधवारी सकाळी घडली.
भगवान उत्तम चौधरी ( वय ४०, रा़ मादळमोही ता गेवराई, जि़ बीड) व राजू रावसाहेब माळी ( वय ४२, रा. चंदनापरी, पो तालेवाडी, ता. अंबड जि जालना) या दोघांचा त्या मृतांमध्ये समावेश आहे. दुपारी बारापर्यंत विहिरीतून भगवान चौधरी यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे परंतु राजू माळी यांचा मृतदेह सापडला नाही. त्याचा शोध घेतला जात असून त्यासाठी कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व त्यांचे पथक प्रयत्न करीत आहेत.