गौडगावात दोन गटात मारहाण
By admin | Published: July 12, 2014 12:09 AM2014-07-12T00:09:52+5:302014-07-12T00:09:52+5:30
दंगा काबू पथक तैनात: ३६ जणांवर परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल
गौडगाव : बार्शी तालुक्यातील गौडगाव येथे गुरुवारी दोन गटात किरकोळ कारणावरून हाणामारी झाली; मात्र शुक्रवारी दोन्ही गटांच्या एकूण ३६ जणांवर वैराग पोलीस ठाण्यात परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.शुक्रवारी गावातील सर्व व्यवहार बंद होते़ अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा काबू पथक तैनात करण्यात आले आहे़
सविस्तर वृत्त असे की, १० जुलै रोजी स्वप्निल भोंग हा शेताकडे जात असताना पारधी समाजाचे परमेश्वर शिंदे यांच्या घरासमोर फावडे दिसले़ ते आमचे आहे म्हणताच शिंदे याने स्वप्निल यास मारहाण केली़ स्वप्निलने वडील माधव भोंग यांना परमेश्वर शिंदे याने मारहाण केल्याचे सांगितले़ त्यानंतर गावातील २५ ते ३० तरुणांना याची माहिती देण्यात आली़ या तरुणांनी परमेश्वर शिंदे यांना मारहाण केली़
परमेश्वर शिंदे हा शुक्रवारी सकाळी वैराग पोलीस ठाण्यास जाऊन ३२ जणांविरोधात मारहाण, घराची तोडफोड व मोटरसायकलचे नुकसान केल्याची तक्रार दिली़ त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला़ त्यामध्ये माधव भोंग, नाना भोंग, हिराचंद शिंदे, नामदेव शिंदे, मदन आरगडे, स्वप्निल भोंग, विशाल भोसले, भैय्या भोसले, रमेश ठाकर, नाना काकडे, विजय काजळे, सागर भड, वैजिनाथ काजळे, विनोद काजळे, कल्याण भड, रामा काजळे, नाना यादव, नितीन काकडे, दत्तात्रय काकडे, पवन काजळे, पवन लोट, दत्तात्रय काकडे, राजाभाऊ चव्हाण अमोल भोसले, नागनाथ मगर, नाना कापसे, शिवाजी लांडगे, पांडू ढमे, गणेश मगर, खुदबुद्दीन शेख, मिटू यादव, अनिल आरगडे यांचा समावेश आहे़
३२ जणांवर गुन्हा दाखल झाल्याने शुक्रवारी सकाळी गावातील एका गटाचे जवळपास ८०० नागरिक एकत्र जमले़ यावेळी बार्शीहून आलेले उपविभागीय अधिकारी ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत शिंदे, दत्तात्रय कदम यांच्याशी चर्चा केली; मात्र पारधी समाजाचा एकही प्रतिनिधी तेथे उपस्थित नव्हता़
गौडगावमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगा काबू पथक व स्ट्रायकिंग पथक तैनात करण्यात आले़
------------------------
गावातील व्यावहार बंद
चर्चेनंतर माधव भोंग यांनीही रवी शिंदे, विकास शिंदे, नंदू शिंदे, परमेश्वर शिंदे यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल केला़ दोन्ही गटातील एकूण ३६ जणांवर वैराग पोलिसांत गुन्हे दाखल झाले.गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सर्व व्यवहार शुक्रवारी बंद होते़