बगिचा व्हावा, होऊ नये यासाठी भाजपाच्या दोन गटांचे उपोषण मिटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:23 AM2021-07-30T04:23:44+5:302021-07-30T04:23:44+5:30
जुना किणी रोडजवळ शासनाकडून मंजूर केलेला बगीचा व्हावा म्हणून एक गट तर दुसरा गट होऊ नये म्हणून नगरपालिकेसमोर दोन ...
जुना किणी रोडजवळ शासनाकडून मंजूर केलेला बगीचा व्हावा म्हणून एक गट तर दुसरा गट होऊ नये म्हणून नगरपालिकेसमोर दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरु होते. उपोषण करणारे दोन्ही गट भाजपाचे होते. यामुळे शहरात उलटसुलट चर्चा होत होती. उपोषण सोडविण्यासाठी बुधवारी रात्री उशिरापर्यंत भाजपचे एक शिष्टमंडळ प्रयत्नशील होते. मात्र यश आले नव्हते. अखेर गुरुवारी त्याच शिष्टमंडळाला यश आले.
किणी रोडवरील वस्ती येथे नगरपालिकेच्या मालकीच्या आरक्षित खुली जागेत बाग विकसित करणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांना व ज्येष्ठांना खेळण्यासाठी, बसण्यासाठी सोयीचे होणार आहे. असे मत ग्वल................. समाज पंचकमिटीचे होते. हा बगिचा होण्यासाठी नगरपालिकेसमोर नगरसेवक जितेंद्र यारोळे, ईरेषा यारोळे, सुखदेव चिंचोळकर, तुळजाराम यारोळे यांच्यासह अनेकांंनी उपोषण सुरू केेले होते.
त्यांचा विरोधी गट असलेल्या बगिचा हटाव संघर्ष समितीने मात्र बगिचा होऊ नये, त्या ठिकाणी स्मशानभूमी आहे. बगिचा झाल्यास अंत्यविधी कुठे करणार, बगिचा झाल्यास शासनाचे कोट्यवधी रुपये वाया जाणार आहेत. यापूर्वी शहरात मैंदर्गी रस्त्यावरील हिंदू स्मशानभूमीजवळ लाखो रुपये खर्चून तयार केलेल्या बगिचाची अवस्था काय झाली, अशी भूृमिका घेऊन उपोषण सुरू केले होते.
बगिचा होऊ नये म्हणून अंकुश चौगुले, रिपाइंचे अविनाश मडिखांबे, नगरसेवक विकास मोरे, अंबूबाई कामनूरकर, अश्विनी मोरे, अमर सिरसाट, सुनील खवळे, योगेश पवार, प्रसाद माने, अप्पू पराणे, ऋषिकेश लोणारी, सिद्धराम माळी आदी उपोषणाला बसले होते.
उपोषण सोडवण्यासाठी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, महेश हिंडोळे, बसलिंगप्पा खेडगी, उत्तम गायकवाड, सलीम येळसंगी यांनी प्रयत्न केले. अखेर दुसऱ्या दिवशी यश आले.
--------
बगिचा होऊ नये म्हणून उपोषणाला बसलेल्या नगरसेवकांनी कायदेशीर बाबी पूर्ण होण्याआधी हरकत घ्यायला हवी होती. बगिचा होण्यासाठी शासनाची कार्यवाही पूर्ण झाली आहे. दप्तरी बगिचासाठी जागा आरक्षित आहे. आम्ही कोणालाही उपोषणाला परवानगी दिली नव्हती. अखेर बगिचा कामाला स्थगिती दिली. उर्वरित कामे करण्यात येणार आहेत.
- सचिन पाटील, मुख्याधिकारी
------
पोलीस ठाण्याकडून कोणत्याही प्रकारच्या उपोषणाला परवानगी दिली नाही. त्यासाठी त्यांच्याकडून अर्ज प्राप्त झाला होता. चार लोक बसू शकतात. त्यापेक्षा अधिक लोक बसलेले दिसल्यास कारवाईला पात्र राहावे लागते. गुरुवारी उपोषण मिटले आहे.
- गोपाळ पवार, पोलीस निरीक्षक, उत्तर
पोलीस ठाणे.