कारीत दोन घरे फोडून दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:21 AM2021-03-18T04:21:10+5:302021-03-18T04:21:10+5:30
कुसळंब : बार्शी तालुक्यात कारी येथे दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना ...
कुसळंब : बार्शी तालुक्यात कारी येथे दोन बंद घरे फोडून चोरट्यांनी दागिन्यांसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. ही घटना १६ मार्च राेजी घडली. १७ मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरफोडी लक्षात आली.
शिवाजी ज्योतिराम माने यांच्या घरातील कपाट उचकटून त्यातील दागिन्यांसह रोख रक्कम पळविली. त्यांच्या शेजारी राहणारे सतीश सारंग यांच्या घरातून दोन मोबाईल असा एकूण एक लाख ९६ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. याबाबत शिवाजी ज्योतिराम माने (वय ६५, रा. कारी, जिल्हा उस्मानाबाद) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. सुगीचे दिवस असल्याने माने कुटुंबीय जेवणखाणे करून झोपण्यासाठी शेतात गेले होते, तर दोन सुना व पत्नी हे स्वयंपाक खोलीस कुलूप लावून शेजारी खोलीत झोपी गेले होते.
१७ मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास माने यांच्या सूनबाई अंगण झाडत असताना त्यांना स्वयंपाक घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत डोकावले असता घरफोडीचा प्रकार निदर्शनास आला. घराच्या पाठीमागे शेतामध्ये कागदपत्रांची पिशवी सापडली. माने यांच्या घरातून जवळपास ५२,५०० रुपये, दीड तोळे वजनाची दोन कर्णफुले, २४,५०० रुपयांची झुबे, पिळ्याची अंगठी असा ८७,५०० रुपये किमतीचा ऐवज पळविला. तसेच साखळी गंठण १७,५०० रुपयांचे पळविले.
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसाट, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश चौगुले, विनोद बांगर, उमेश कोळी, विनायक घुगे, सुनील बोधनवाड हे घटनास्थळी दाखल झाले.