तेलंगणा, आंध्र आणि तामिळनाडूतील अडीचशे मुली सोलापुरात अडकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2020 01:03 PM2020-05-09T13:03:19+5:302020-05-09T13:03:27+5:30
दिल्लीच्या कंपनीचा पोबारा; नोकरीच्या आमिषाने मुलींकडून वसूल केले कोट्यावधी रुपये
सोलापूर : आमची मोठी कार्पोरेट कंपनी आहे. कंपनीमार्फत मार्केटिंंग करून लाखो रुपये कमवा, असे आमिष दिल्लीतील एका कंपनीने दाखवले. या आमिषाला बळी पडून आंध्र, तेलंगणा आणि तामिळनाडूतील शेकडो मुली सोलापुरात आल्या. लॉकडाऊनच्या काळात कंपनीने हात वर करून सोलापुरातून पोबारा केला. कंपनीचे प्रतिनिधी मुलींकडे लक्ष देईनात. मुलींचे हाल सुरू असल्याने मुलींना सोनी महाविद्यालयाच्या एनजीओमार्फत निवारा देण्यात आला आहे. मनपा प्रशासनाकडून त्यांची देखभाल सुरू आहे.
सर्व मुलींना त्यांच्या गावी जाण्याची ओढ लागली आहे. याप्रकरणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून मुलींना आंध्रात आणि तेलंगणात पाठवून देण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ट्विटरद्वारे केली आहे. त्यामुळे या विषयाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आंध्रातील एका आमदाराने सोलापुरातील नगरसेवक नागेश वल्याळ यांना फोन करून मुलींची मदत करायला सांगितले आहे. त्यानंतर वल्याळ यांनी सैफुल येथील सोनी महाविद्यालयाकडे धाव घेतली.
तामिळनाडू येथील के. सुगना देवी यांनी अत्यंत आक्रमक आणि निराशेतून लोकमतकडे भावना व्यक्त केल्या. त्या अस्सल इंग्रजी बोलतात. त्या विवाहित असून, त्यांना दोन मुले आहेत. गावाकडे या एका इंग्रजी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होत्या. चांगली नोकरी मिळेल आणि चांगला पगारही मिळेल, या आशेने त्या काही दिवसांपूर्वी सोलापुरात आल्या.
सोलापुरात आल्यानंतर त्यांना मार्केटिंंग करायला सांगितले, ते त्यांना जमणार नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. सोमनाथ देव यांच्याकडून कंपनीने १७ हजार रुपये उकळल्याचा आरोप देव यांनी केला. आता त्यांच्याकडे खायला आणि राहायलाही पैसे नाहीत. प्रशासनाकडून त्यांना तामिळनाडूकडे पाठवण्याची व्यवस्था झाली आहे. याबाबत त्या समाधानी असल्या तरी कंपनीविरोधात वकिलामार्फत केस करणार असल्याचे त्या आक्रमकपणे सांगतात.
कंपनीकडून दिशाभूल.. आता नवºयाला काय सांगू?
- आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथील रहिवासी कोईलदा कृष्णवेणी (शिक्षण- बी.कॉम. कॉम्प्युटर) या सांगतात, कृषीविषयक नोकरी देण्यात येईल, असे आमिष मला दिल्ली येथील एका कंपनीने दाखवले. माझ्याकडून अठरा हजार रुपयेदेखील वसूल केले. नोकरीच्या आमिषाने मी अठरा हजार रुपये कंपनीला दिले. नोकरीकरता मला सोलापुरात यावे लागेल, असे कंपनीकडून सांगितल्यानंतर मी सोलापुरात आले. सोलापुरात आल्यानंतर कळाले की, सदर कंपनी कृषीविषयक नोकरी न देता मार्केटिंंग करायला सांगितले. मला मार्केटिंंग येत नव्हते. त्यामुळे मी मार्केटिंंग करणार नसल्याचे कंपनीला साफ सांगितले. कंपनीला दिलेले १८ हजार रुपये देखील परत करायला सांगितले. कंपनीने का...कूं....करत फक्त बारा हजार रुपये परत केले, उर्वरित सहा हजार रुपये देणार नसल्याचे सांगितले. मागील ३ महिन्यांपासून मी सोलापुरातच अडकून आहे. विवाहित असून, आता पुन्हा गावाकडे जाण्याची ओढ लागली आहे. गावाकडे गेल्यानंतर नवºयाला काय उत्तर देऊ, याची अनामिक भीती लागून राहिली आहे.
सर्व मुलींना पहिल्यांदा त्यांच्या गावी पाठवा...
झटपट पैसे कमावण्याच्या उद्देशाने आणि चांगली नोकरी मिळेल, या आमिषाने या सर्व मुली सोलापुरात आल्या. येथे आल्यानंतर सर्वांच्या आशा आणि अपेक्षांचा चक्काचूर झालेला आहे. तीन राज्यांतील अडीचशे मुली सोलापुरात अडकून आहेत, त्या सर्व जण निराश आहेत. त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न सुरू आहेत. सोलापूर प्रशासनाने पहिल्यांदा त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था करावी. चंद्राबाबू नायडू यांनी उद्धव ठाकरे यांना ट्विटरद्वारे विनंती केली आहे आणि तथाकथित कार्पोरेट कंपनीची चौकशी व्हायला पाहिजे, याकरिता मी प्रशासनाकडे पाठपुरावा करणार आहे.
- नागेश वल्याळ, नगरसेवक, सोलापूर