बारा हजार घरांना दोनशे कोटींचे गृहकर्ज, डिसेंबरमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
By बाळकृष्ण दोड्डी | Published: November 2, 2023 12:26 PM2023-11-02T12:26:27+5:302023-11-02T12:26:49+5:30
रे नगर प्रकल्पातील पंधरा हजार तयार घरकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे.
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : कुंभारी येथील रे नगर घरकुल प्रकल्पातील बारा हजार घरकुलांना जिल्ह्यातील विविध बँकांनी २१६ कोटीचे गृहकर्ज वितरित केले आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार पैकी १४ हजार ३०० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.
रे नगर प्रकल्पातील पंधरा हजार तयार घरकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी नोव्हेंबर अखेर किंवा २५ डिसेंबरला सोलापुरात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित रे नगर येथील घरकुल कामांचा साप्ताहिक आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता पाटील यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी व रे नगर हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे काम माहे नोव्हेंबर अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.