coronavirus; एकाच गावचे अडीचशे ट्रकचालक परतले पिंपरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 12:28 PM2020-04-02T12:28:52+5:302020-04-02T12:30:45+5:30
सुरक्षा पाहिजे, चला गावाकडं... : गल्लोगल्ली घरापुढे वाहनांची चाके विसावली
शहाजी फुरडे
बार्शी: प्रत्येक गावाची, शहराची स्वतंत्र अशी ओळख असते. अगदी असंच काहीसं बार्शी तालुक्यातल्या पिंपरी(आर)चं आहे. येथे एक नव्हे..दोन नव्हे़़ तब्बल ३०० च्या आसपास ट्रकचालक आहेत. ड्रायव्हरचं गाव म्हणून या गावाला ओळखलं जातं. घरागणिक इथं ट्रक आहेत. सध्या कोरोनाचं लोण सर्वत्र पसरलं आहे. पिंपरीकर वाहनचालकांनी आपल्या सुरक्षेसाठी गाव गाठलं आहे. इथं जवळपास बºयाच जणांच्या घरासमोर, पटांगणात जिकडं पाहावं तिकडं ट्रक दिसतात. कोरोनाच्या निमित्तानं देशभर फिरणाºया या मालट्रकच्या चाकांना विसावा मिळाल्याचं यानिमित्तानं दिसू लागलं आहे.
पिंपरी(आर) हे बार्शीपासून सुमारे वीस कि़मी़ अंतरावरील गाव जामगाव-भातंबरे रोडवर आहे. गावाचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे़ गावची लोकसंख्या ही १२०० च्या जवळपास आहे़ गावात द्राक्षबागांचे प्रमाणही जास्त आहे़ विशेष म्हणजे गावात मुस्लीम बहुल लोकसंख्या जास्त आहे़ तरीदेखील सर्वजण गुण्यागोविंदाने नांदतात़ कधीच गावात जाती-धर्मावरुन भांडणे नाहीत़ गावाची एकी कायम आहे़ गावाचा दर्गाह हा ग्रामदैवत आहे.
गेल्या २५ वर्षांपूर्वी गावातील श्रीमंत गोफण हे पहिल्यांदा ड्रायव्हर झाले. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत गावातील तरुण क्लीनर म्हणून नेले व एकाचे दोन-चार असे करत गेल्या दहा-पंधरा वर्षांत गावातील ड्रायव्हरचा आकडा वाढत गेला. आजच्या स्थितीला गावात मालट्रक चालवण्याचा वाहन परवाना असलेले सुमारे ३०० ड्रायव्हर आहेत़ यातील पन्नास जणांनी आता वय झाल्यामुळे काम बंद केले आहे.
२५ जण झाले ट्रकमालक
- एस़टी़ महामंडळातदेखील ड्रायव्हर म्हणून गावातील नऊ जण कार्यरत आहेत़ तर या ड्रायव्हरच्या व्यवसायातून सुमारे २५ जणांनी स्वत:च्या मालकीचे ट्रक घेतले आहेत़ तर १५० जण राज्यातील विविध रोडलाईन्सच्या आंतरराज्य मालवाहतूक करणाºया ट्रकवर ड्रायव्हर म्हणून काम करत आहेत़ यांना या व्यवसायातून महिन्याला दहा हजारांपासून २० हजारांपर्यंत पगार मिळत आहे़