दोन लाखांची रोकड दूधवाल्यानं व्यापाऱ्याला केली परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:11+5:302021-09-21T04:25:11+5:30
व्यापारी तालापल्ली यांची रविवारी (१९ सप्टेंबर) दुपारी १ वाजता प्रवास करत असताना दोन लाख रुपये असलेली बॅग हरवली होती. ...
व्यापारी तालापल्ली यांची रविवारी (१९ सप्टेंबर) दुपारी १ वाजता प्रवास करत असताना दोन लाख रुपये असलेली बॅग हरवली होती. एवढी मोठी रक्कम हरवल्यामुळे ते हवालदिल झाले. दरम्यान, त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून वेळ न दवडता तपास सुरु केला. तपास करत असताना एका दूधवाल्याला ही पैशाची बॅग सापडली असल्याची समोर आले. दूधवाले मारडकर हेही संबंधित व्यक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी सर्वच्या सर्व रक्कम पोलिसांच्या स्वाधीन केली.
राजेश तालापल्ली यांनी दोन लाखांची बॅग हरवल्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तेव्हा करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी हवालदार देवकर, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, तौफिक काझी, सोमनाथ जगताप, गणेश खोटे यांना तपासाची चक्रे फिरवण्याचे आदेश दिले. याच दरम्यान दूधवाल्याने एवढ्या मोठ्या रकमेची बॅग परत केली. बॅग मिळाल्याने व्यापारी तालापल्ली यांनी दूधवाल्या मारडकर यांना स्वेच्छेने दहा हजार रुपये बक्षीस म्हणून दिले. पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे.