सोलापूरातील राज्य मागासवर्ग आयोगासमोरील जनसुनावणीत दोन लाखांवर निवेदने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:08 PM2018-05-05T15:08:44+5:302018-05-05T15:08:44+5:30
राजकीय नेत्यांचा निवेदने देण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगासमोर झालेल्या जाहीर जनसुनावणीमध्ये सुमारे दोन लाखांवर निवेदने सादर झाली. शेती, शिक्षण आणि नोकरी मिळविण्यात येणाºया अडचणी यांसह विविध मुद्यांच्या आधारे समाजाच्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न आयोगाच्या सदस्यांसमोर केला.
समाजाचे आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठी निवेदनेही सादर केली. या निवेदनांची संख्या तब्बल दोन लाखांवर असावी, असा अंदाज खुद्द समितीचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केला. आजवर झालेल्या सुनावणीत सर्वाधिक निवेदने सोलापुरात प्राप्त झाल्याचेही ते म्हणाले.
सोलापूरात सकाळी ११ वाजता जनसुनावणीला प्रारंभ झाला. आयोगाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, प्रा. राजाभाऊ करपे या सदस्यांसह आयोगाचे सचिव डी. डी. देशमुख निवेदन स्वीकारत होते. सर्वप्रथम मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि व्हीव्हीपी इन्स्टिट्यूटचे सचिव अमोलनाना चव्हाण यांनी निवेदन दिले. त्यांनी मोहोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींचे ठराव सोबत जोडले होते. चव्हाण यांनीही काही संस्थांचे ठराव जोडले होते.
यानंतर शिवसेनेचे प्रताप चव्हाण, मयूर जाधव, महेश धाराशिवकर, तुकाराम मस्के यांनी निवेदन दिले. भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अनिता जगदाळे यांनी २०८ बचत गटांचे निवेदन सादर केले. प्रल्हाद काशीद यांनीही निवेदन दिले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, राम साठे, किसन जाधव, सुनीता रोटे, दादाराव रोटे, रियाज कुरेशी, जुबेर बागवान यांनीही निवेदने सादर केली. छावा संघटनेचे योगेश पवार, विवेकानंद डिगे यांनी सात हजार पानांचे निवेदन दिले. व्हीव्हीपी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष जी. के. देशमुख, सचिव अमोलनाना चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांसमवेत निवेदन सादर केले. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे दिलीप कोल्हे, नाना काळे, नगरसेवक विनोद भोसले, एन.एस.यु.आय.चे गणेश डोंगरे, संभाजी आरमारकडून श्रीकांत डांगे, शिवाजी वाघमोडे, मोहोळचे नगराध्यक्ष रमेश बारसकर, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजय भोसले, अमोल भोसले, सई महिला मंडळाच्या वतीने नलिनी जगताप, उत्तरा बरडे, डॉ. सुनीता पाटील, सुनीता गरड, शोभना सागर यांनीही निवेदन दिले.
मोहोळच्या डॉ. स्मिता पाटील यांनी महिलांची आणि शेतकºयांच्या विपन्नावस्थेची बाजू आयोगापुढे मांडली. पंढरपूर तालुक्यातून सुमारे १० हजारांवर निवेदने सादर झाली. भगीरथ भालके, समाधान काळे आणि त्यांच्या सहकाºयांनी निवेदने सादर केली. सांगोला मराठा सेवा संघाच्या वतीनेही निवेदने सादर करण्यात आली.
दोन मंत्री-आमदारही उपस्थित राहिले
- आयोगाचे सदस्य भोजन करीत होते, त्यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे आगमन झाले. भोजनानंतर सदस्य सहकारमंत्र्यांकडे येत होते. त्यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनी तसे करणे योग्य नाही, आपणच तिकडे जाऊ असे म्हणाले आणि निवेदन दिले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार दिलीप सोपल, आमदार दत्तात्रय सावंत यांनीही सदस्यांना निवेदन देऊन आरक्षणाची आग्रही मागणी केली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे, पद्मजादेवी मोहिते-पाटील यांनीही निवेदन दिले.
करमाळा तालुक्यातून १३ हजार निवेदने
करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने १३ हजार निवेदने सादर करण्यात आली. विलास घुमरे यांच्या नेतृत्वाखाली सुधाकर लावण, मिलिंद फंड, गणेश वळेकर, कमलाकर वीर, बाळासाहेब सूर्यवंशी, विजय लावण, सुरेश घाडगे आदी मंडळी यावेळी उपस्थित होती.
‘सकल’चे उत्तम नियोजन
- समाजकल्याण विभाग आणि सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदनाच्या नोंदी करण्यात येत होत्या. सकल मराठा समाजाच्या वतीने माऊली पवार, रवि मोहिते, दत्तामामा मुळे, राजन जाधव, भाऊ रोडगे, मनमोहन चोपडे, बाळासाहेब गायकवाड, मनोज शिंदे, विजय पोखरकर, जीवन यादव, सदाशिव पवार, संजय जाधव, नलिनी जगताप, सुनीता गरड आदींनी परिश्रम घेतले.
निवेदनात बार्शीची आघाडी
- बार्शी तालुक्यातून सर्वाधिक निवेदने आयोगापुढे आली. ही संख्या २३ हजार होती. विश्वास बारबोले, नगरसेवक मदन गव्हाणे, महेश देशमुख, किरण गाढवे, रावसाहेब यादव, दिलीप सुरवसे, भैय्या देशमुख, चैतन्य जगदाळे, कल्याण घळके आदींनी निवेदनांचा गठ्ठाच आयोगाच्या सदस्यांपुढे सादर केला. यात सर्वपक्षीय ४० नगरसेवक, लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी मिळून ४८ निवेदने, ३५० बचत गटांचे ठराव, ८१ ग्रामसभांचे ठराव, ग्रामपंचायतींचे ठराव, सामाजिक आणि नोंदणीकृत संस्था, तसेच नागरिकांच्या २१ हजारांवर निवेदनांचा यात समावेश होता.
मराठा सेवासंघाकडून निवेदनात विशेष दक्षता
- मराठा सेवा, संभाजी बिग्रेड आणि जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची लक्षवेधी उपस्थिती होती. या सुनावणीवेळी काही मंडळींनी ‘इव्हेंटबाजी’ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाज कसा मागास आहे, यासंदर्भातील निवेदने सादर केली. शेती, नोकरीतील अडचणी, आर्थिक अडचणीमुळे होणारा महिलांचा कोंडमारा, मुलींच्या शिक्षणात येणारे अडथळे, हुंडा प्रथा, आरोग्याचे प्रश्न आदी मुद्दे मांडून त्यांनी आरक्षणाची मागणी केली. यामध्ये प्रशांत पाटील, किरण घाडगे, राम गायकवाड, अभिंजली जाधव, प्रा. रोहन माने, पोपट भोसले, अमोल शेंडगे, उत्तमराव शेंडगे, प्रिया नागणे, सुरजा बोबडे, अक्काताई माने, पल्लवी मोरे, स्वाती पवार, उज्ज्वला गव्हाणे, लता ढेरे, प्राजक्ता शेळके, माधुरी चव्हाण, संजीवनी मुळे, वर्षा मुसळे, शशांक जाधव, स्वागत कदम, राम गायकवाड, सचिन जगताप, सुहास टोणपे, दिनेश जगदाळे आदी उपस्थित होते.
‘लोकमंगल’, भाजपाकडूनही निवेदने
लोकमंगल परिवाराकडूनही अनेक निवेदने सादर झाली. लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख यांनी बचत गटांची निवेदने सादर केली. भाजपा नेते इंद्रजित पवार, उत्तर सोलापूर पंचायत समितीच्या सभापती संध्याराणी पवार, भाजपाचे उत्तर सोलापूर तालुकाध्यक्ष काशिनाथ कदम, दक्षिणचे रामप्पा चिवडशेट्टी यांनीही निवेदने सादर केली.