दोघा जडीबुटी विक्रेत्यांना मारहाण करून दोन लाख लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:21 AM2021-04-11T04:21:55+5:302021-04-11T04:21:55+5:30
टेंभुर्णी : गावोगावी फिरून जडीबुटी आयुर्वेदिक औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोघांना पाच दरोडेखोरांनी मारहाण करून रोख १५ हजार आणि ...
टेंभुर्णी : गावोगावी फिरून जडीबुटी आयुर्वेदिक औषध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोघांना पाच दरोडेखोरांनी मारहाण करून रोख १५ हजार आणि एटीएम व गुगल पे द्वारे एक लाख ८५ हजार रुपये लुटले. या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत त्या पाचजणांपैकी तिघांना पकडले. त्यांच्याकडून ७४ हजार हस्तगत केले आहेत.
आढेगाव - कुर्डूवाडी दरम्यान ५ एप्रिल रोजी सकाळी १० ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. पकडलेल्या दोघांना माढा न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकाऱ्यांनी प्रथम ९ एप्रिलपर्यंत, नंतर ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. प्रवीण सुरेश गायकवाड (वय २१), नवनाथ मच्छिंद्र लेंगरे (२४), चंद्रकांत भीमा खंडाळे (३१, तिघेही रा. आढेगाव, ता. माढा) अशी पोलीस कोठडीतील आरोपींची नावे असून, बापू भिवा खरात (रा. आढेगाव) व अमोल दत्तू सावंत (रा. इंदापूर) हे दोघेजण फरार आहेत.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, कन्हैयासिंग देविसिंग चितोडिया (२७, रा. साखरे वस्ती हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) हे हल्ली इंदापूर तालुक्यात बावडा येथे राहतात. ते गावोगावी फिरून आयुर्वेदिक औषध विक्री करतात. त्यांनी आढेगाव येथील एका व्यक्तीला औषध दिले होते. त्याचे दोन हजार रुपये घेण्यासाठी कन्हैयासिंग व त्यांचे नातेवाईक नरेंद्र चितोडिया हे दोघे सोमवारी सकाळी कार (एम. एच. १०/ २९०) मधून आढेगाव येथे आले. त्यावेळी तिघेजण तेथे आले. तुम्ही औषध चांगले देत नाही, तुम्ही पोलीस स्टेशनला चला म्हणत त्यांना जीपमध्ये बसविले. यावेळी त्यांनी आणखी दोघांना बोलाविले. त्यांना काळ्या रंगाच्या जीपमध्ये बसण्यास सांगितले. जीपमध्ये बसण्यास विरोध करताच त्यांना मारहाण केली.
या गाड्या टेंभुर्णीकडे निघाल्या. त्या दोघांनी वडील देविसिंग चितोडिया व नातेवाइकांच्या मदतीने टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी कन्हैयासिंग चितोडिया यांनी फिर्याद दिली.
या प्रकरणाची दखल घेत पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सहायक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांचे पथक तयार करून तिघांना अटक केली.
---
फसवणूक केल्याचा व्हिडिओ बनविला
दरम्यान, प्रवासात आरोपींनी त्यांना मारहाण केली. टेंभुर्णीजवळ येताच बायपास रस्त्याने करमाळा रस्त्याच्या पुलाजवळ गाडी थांबवली. आम्ही आढेगाव येथील लोकांना फसविले आहे असे म्हणा.. आम्ही तुमचा व्हिडिओ काढतो असे सांगत मोबाईल व्हिडिओ सुरू केला. मारहाण करत १५ हजार रुपये काढून घेतले. यानंतर दोन लाख रुपयांची मागणी करीत नरेंद्र यांना घेऊन जाऊन एटीएममधून २० हजार रुपये काढून घेतले. नंतर कुर्डूवाडी येथे नेऊन गुगल पे द्वारे पैसे काढले. या परिसरात फिरकायचे नाही, असा दम देत त्यांना कुर्डूवाडी येथे सोडले.