खेडभोसेत विद्युत तारा तुटून दोन दुभती जनावरे दगावली
By काशिनाथ वाघमारे | Published: April 16, 2023 06:43 PM2023-04-16T18:43:04+5:302023-04-16T18:43:22+5:30
खेडभोसे गावला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही लाइन जवळपास ४० वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे.
सोलापूर : पंढरपूर तालुक्यात खेडभोसे येथे तुटून पडलेल्या प्रवाहीत विद्युत तारांचा स्पर्श होऊन दोन दुभती जनावरे दुगावली. एक म्हैस आणि एक जर्शी गाय अशा दोन दुभती जनावरे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, खेडभोसेतील शेतकरी सत्यवान विठ्ठल पवार यांनी सायंकाळी जर्शी गाय आणि म्हैस दारात बांधलेली हाेती. रात्री अचानक येथून गेलेली ३३ केव्ही प्रवाहीत विद्युत तारा तुटून पडल्या. या तारांना या दुभत्या दोन्ही जनावरांचा स्पर्श झाला. या घटनेमुळे सत्यवान पवार यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या घटनेनंतर तलाठी प्रकाश भिंगारे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
खेडभोसे गावला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही लाइन जवळपास ४० वर्षांपूर्वी टाकण्यात आली आहे. या लाइनवर अतिरिक्त भार असल्यामुळे आणि चाळीस वर्षे जुनी असल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केला जात आहे. जुन्या विद्युत तारा बदलून नवीन तारा बसवाव्यात, अशी मागणी खेडभोसे सोसायटीचे चेअरमन बंडू पवार यांनी केली आहे.