सोलापुरातील दोन मंत्र्यांचा फायदा की तोटा, तुम्हीच ठरवा ! सुशिलकुमार शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 10:42 AM2018-10-25T10:42:52+5:302018-10-25T10:47:19+5:30
लोकमत भवनात दिल्लीपासून गल्लीपर्यंत... सर्व मुद्यांवर रोखठोक उत्तरे; निधी उपलब्ध असूनही दुहेरी पाईपलाईन का नाही ?
सोलापूर : सोलापुरात भाजपचे दोन मंत्री आहेत. त्यांचा सोलापूर जिल्ह्याला फायदा आहे की तोटा? हे तुम्हीच ठरवा, असा प्रश्न माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मंगळवारी ‘लोकमत’च्या माध्यमातून सोलापूरकरांसमोर ठेवला.
शिंदे सध्या सोलापूरच्या दौºयावर आहेत. सोलापुरात आले की, सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात ते व्यस्त असतात. काँग्रेस पक्षाचा गोतावळा नेहमीच त्यांच्या भोवती असतो. शिवाय आपल्या अडचणी घेऊन येणाºया सोलापूरकरांचीही ‘जनवात्सल्य’वर गर्दी असते; पण यातून थोडीशी उसंत काढून त्यांनी कोजागरी पौर्णिमेच्या सायंकाळी लोकमत भवनाला सदिच्छा भेट दिली.
लोकमत’शी त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध प्रश्नांवर, मुद्यांवर मनमोकळेपणे गप्पा मारल्या... सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यावर प्रत्यक्ष टीका करण्याचे टाळून त्यांनी उपरोक्त प्रश्न उपस्थित केला. महापालिकेतील भाजपच्या कारभाराबाबत त्यांनी नापसंती व्यक्त केली. पाणीपुरवठ्यासाठी ‘एनटीपीसी’कडून मी २५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले; पण सत्ताधारी भाजप पाच वर्षांत या निधीचा विनियोग करू शकले नाही, असे ते म्हणाले.
सोलापूर हा दुष्काळी क्षेत्रातील जिल्हा आहे. येथे मोठ्या संख्येने साखर कारखाने आहेत आणि उसाला पाणी मिळते म्हणून जिल्ह्यात सुकाळ आहे, असे उगीचच तुम्ही म्हणू शकत नाही, असे सांगून शिंदे यांनी सोलापूरच्या विकासावर भाष्य केले. ते म्हणाले, सोलापुरात उड्डाण पूल झाले पाहिजेत, शहर सुंदर असले पाहिजे आणि दळणवळणाची उत्तम व्यवस्था येथे असली पाहिजे. होटगी रोडवरील विमानतळासाठी नाईट लँडिंगची सुविधा माझ्या कार्यकाळातच दिली होती. फडणवीस सरकारने आता तेथे नाहकपणे २५ कोटी रुपये खर्च केले. या पैशात बोरामणी विमानतळावर एअर स्ट्रिप तयार झाली असती, असे सांगतानाच होटगी रोडवरील विमानतळावर आयटी पार्क निर्माण करण्याची आमची भूमिका होती, असे शिंदे यांनी सांगितले.
देशाचे गृहमंत्रिपद भूषविताना त्यांना साहजिकच काश्मीरमध्येही लक्ष घालावे लागत होते. त्यामुळे काश्मीर मुद्यावरील प्रश्नावर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चर्चेशिवाय ही समस्या सुटणार नाही, असे स्पष्ट केले. ते म्हणाले, काश्मीर प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी भारत आणि पाकिस्तानला एकत्र यावे लागणार आहे. विघटनवाद्यांशी बोला, असे मी नेहमीच म्हणतो. सध्या जी ‘वाईप आऊट’ अर्थात अतिरेक्यांचा खात्मा करण्याचे जे धोरण अवलंबिले आहे ते काश्मीर समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरणार नाही.
मोदी सरकारने आपल्या कार्यकाळात चुकीचे निर्णय घेतल्यामुळेच महागाई वाढली आहे. नोटाबंदीपूर्वी स्थिती थोडी बरी होती; पण नंतर कोसळली. त्यामुळेच महागाईचा प्रश्न अधिकच गंभीर झाला, अशी टीका करून काँग्रेसच्या सत्ताकाळातही सनातन संस्था, राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कारवाया होत्या. त्याप्रमाणेच अल्पसंख्याक संघटना आणि नक्षलवाद्यांच्या कारवाया होत्या. पण या सरकारच्या काळात जातीय तेढ निर्माण करण्याचे काम झाले आहे. येत्या निवडणुकीत या मुद्यासह राफेल खरेदीतील भ्रष्टाचार, इंधनाची दरवाढ आणि महागाई या समस्या घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, असे शिंदे म्हणाले.
पाच राज्यात निवडणुका होत आहेत. राज्यातील मुद्यांवरच त्या लढल्या जातील; पण त्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम असतील, असे सांगून एका प्रश्नावर शिंदे म्हणाले, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या पहिल्या सरकारपेक्षा (यूपीए १), दुसºया सरकारमध्ये (यूपीए २) चांगली कामे झाली; पण त्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांनी आरोप केला आणि आम्ही या आरोपांची पडताळणी केली नाही. कलमाडी, राजा या मंत्र्यांना राजीनामा देण्यास सांगितले. त्यामुळे भ्रष्टाचार केला, असा लोकांचा भ्रम झाला.
प्रणितींच्या कार्यपद्धतीत सुधारणा होत आहे !
४अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये सध्या शिंदे यांच्याकडे कोणतीच जबाबदारी नाही. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, नवीन पिढीसाठी आपण जागा करून दिली पाहिजे. नवी पिढी डॅशिंग असते. आक्रमक असते. याचा फायदा पक्षाला होत असतो. शिंदे यांच्या याच विधानावरून आमदार प्रणिती शिंदे यांच्याबद्दल विचारले. प्रणिती यांच्या आक्रमकपणामुळे दुखावलो गेल्याची स्थानिक पातळीवरील नेत्यांची तक्रार आहे. याबद्दल आपणाला काय सांगायचे?.. या प्रश्नावर शिंदे म्हणाले, प्रणितीमध्ये बदल होत आहे. तिच्यामध्ये नक्की सुधारणा होईल, असे त्यांनी आश्वस्त केले.
सर्जिकल स्ट्राईक धोक्याचे!
४सर्जिकल स्ट्राईक हे परराष्टÑ धोरणासाठी धोक्याचे आहे. यामध्ये मानवाधिकाराचेही उल्लंघन होत असल्याची आंतरराष्टÑीय पातळीवर टीका होत असते. मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचा बोलबाला करीत आहे; पण काँग्रेसनेही त्या कारवाया केल्या आहेत. त्यामुळेच तर सीमेपलीकडे असलेल्या अतिरेक्यांच्या ६० कॅम्प्सची संख्या ४० वर आली आहे, असे शिंदे म्हणाले.