आव्हे येथे हिंस्र प्राण्याने फस्त केले दोन महिन्यांचे खोंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:10 AM2021-01-08T05:10:24+5:302021-01-08T05:10:24+5:30
आव्हे येथील शेतकरी सदाशिव नाना पाटील यांची चार जर्शी कालवड, एक देशी गाय, म्हैस, एक रेडी, लहान दोन महिन्यांचे ...
आव्हे येथील शेतकरी सदाशिव नाना पाटील यांची चार जर्शी कालवड, एक देशी गाय, म्हैस, एक रेडी, लहान दोन महिन्यांचे खिलार गायीचे खोंड अशी जनावरे बांधली होती. रात्री अकरा वाजता या जनावरांना वैरण टाकून पाटील घरात झोपण्यासाठी गेले होते. पहाटे ५ वाजता उठून पाहिले असता हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.
त्यानंतर त्यांनी याविषयी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून झालेला प्रकार सांगितला. दुपारी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी महादेव पाटील यांच्या घराच्या परिसराची पाहणी केली. कोणत्या हिंस्र प्राण्याच्या पायाचे ठसे मिळतात याची माहिती घेतली. मात्र पायाचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे येथील गायीचे वासरू नेमके कोणत्या प्राण्याने ठार केले, याविषयी माहिती वनविभाग घेत असल्याची माहिती करकंब विभागाचे वनसेवक जावेद मुलाणी यांनी सांगितले.
या परिसरात आणखी असे काही प्रकार घडल्यास वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यापूर्वी ही पटवर्धन कुरोली, शेवते, खेडभोसे, परिसरात या हिंस्र प्राण्याने शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करून जनावरे खाल्ली आहेत. आता पुन्हा हा प्रकार घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.