रेवणगाव अपघातात दोघे ठार
By Admin | Published: January 14, 2015 10:28 PM2015-01-14T22:28:36+5:302015-01-14T23:20:05+5:30
एसटीची दुचाकीला धडक : मृत सांगोला तालुक्यातील अचकदाणी गावचे
विटा : खानापूरहून विट्याकडे येणाऱ्या कर्नाटक महामंडळाच्या एसटी बसने विट्याहून खानापूरकडे निघालेल्या दुचाकी गाडीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरूण जागीच ठार झाले. अमोल नंदकुमार जाधव (वय २१) व त्यांचा चुलत भाऊ गणेश जाधव (१८, दोघेही रा. अचकदाणी-लोटेवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा तरूणांची नावे आहेत. ही घटना आज, (बुधवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास रेवणगाव (ता. खानापूर) येथे घाटातील वळणावर घडली.
सांगोला तालुक्यातील अचकदाणी (लोटेवाडी) येथील अमोल जाधव व त्यांचा चुलत भाऊ गणेश हे दोघेजण आज बुधवारी दुपारी १ वाजता सुळेवाडी (विटा) येथे बहिणीला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ते परत अचकदाणी गावाकडे त्यांच्या दुचाकीवरून (क्र. एमएच ०९-एफ-३३९१) निघाले असताना, इंडी (विजापूर) हून साताऱ्याकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने (क्र. केए-२८-एफ-१८०६) रेवणगाव घाटातील पहिल्या वळणावर या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील दोघेही तरूण जागीच ठार झाले.
या अपघाताची माहिती विटा पोलिसांना मिळताच सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. घोंगडे, उपनिरीक्षक अमोल शिंदे यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अमोल यांच्या मोबाईलवरून संपर्क साधून अपघाताची माहिती त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आली. त्याचवेळी सुळेवाडी येथील अमोलचे मेहुणे शांताराम पोळ घटनास्थळी गेले. अपघातात ठार झालेल्या दोन्ही तरूणांचे मृतदेह विटा ग्रामीण रूग्णालयात आणून शवविच्छेदन केल्यानंतर ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अपघातात ठार झालेला अमोल हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील ऊसतोड मजुरीचे काम करतात, तर अमोलचा सख्खा चुलत भाऊ गणेश हा सांगोला येथे इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. दोघेही अविवाहित होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी, आजी, आजोबा असा परिवार आहे.
या अपघाताची फिर्याद अमोल यांचे मेहुणे शांताराम पोळ यांनी विटा पोलिसांत दिली असून, तपास उपनिरीक्षक अमोल शिंदे करीत आहेत. (वार्ताहर)
बहिणीची अखेरची भेट
सांगोला तालुक्यातील अचकदाणी (लोटेवाडी) येथील अमोल जाधव व त्यांचा चुलत भाऊ गणेश हे दोघेजण आज बुधवारी सुळेवाडी (विटा) येथे बहिणीला भेटण्यासाठी आले होते. सायंकाळी परत अचकदाणी गावाकडे निघाले असताना, इंडी (विजापूर) हून साताऱ्याकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसने रेवणगाव घाटातील पहिल्या वळणावर या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही तरूण जागीच ठार झाल्यामुळे त्यांची बुधवारची अखेरचीच भेट झाली.
दोघे तरूण जागीच ठार झाल्यामुळे नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
अपघातात ठार झालेला अमोल हा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील ऊसतोड मजुरीचे काम करतात, तर अमोलचा सख्खा चुलत भाऊ गणेश हा सांगोला येथे इयत्ता १२ वीच्या विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता.