शहराचे दोन तुकडे.. पालिकेला ना देणं ना घेणं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:26 AM2021-09-12T04:26:43+5:302021-09-12T04:26:43+5:30
लक्ष्मण कांबळे कुर्डूवाडी : शहरातील मध्यवर्ती भागात बार्शी रोडवर असलेल्या रेल्वे गेट क्रमांक ३८ चा प्रश्न नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल ...
लक्ष्मण कांबळे
कुर्डूवाडी : शहरातील मध्यवर्ती भागात बार्शी रोडवर असलेल्या रेल्वे गेट क्रमांक ३८ चा प्रश्न नगरपालिका प्रशासनाकडून तब्बल १२ वर्षे घोंगडं भिजत ठेवला आहे. रेल्वे प्रशासनाने अखेर वाट पाहून २ ऑगस्ट २०१९ च्या मध्यरात्रीपासून संबंधित गेट कायमस्वरूपी बंद केले आहे. त्यालाही आता दोन वर्षे संपत आली. यामुळे कुर्डूवाडी शहराचे दोन वेगवेगळे भाग निर्माण झाले आहेत. त्या रेल्वे गेटखालून भुयारी मार्ग निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केला, मात्र नागरिकांनी तो बेत हाणून पाडला. येथून उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली. मात्र प्रश्न आणखी किती दिवस लोंबकळत राहणार आहे, असा सवाल कुर्डूवाडीकरांमधून होत आहे.
भुयारी मार्ग होऊ नये यासाठी येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला मुख्यतः रिपाइंसह इतर सर्वपक्षीय आंदोलनेही झाली आहेत. नागरिकांना या ठिकाणी उड्डाणपूल हवा असल्याने रेल्वेने भुयारी मार्गाचे चालू केलेले काम तात्पुरते थांबविलेले आहे. रेल्वे गेटबाबत नागरिकांच्या भावना येथील रेल्वे अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविल्या. त्यावेळी राज्य सरकार जर येथे उड्डाणपूल बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देत असेल तर रेल्वेचा त्याला विरोध नसेल, असे स्पष्ट केले आहे.
त्यालाही एक वर्ष संपत आले परंतु येथील रेल्वे गेटमध्ये भुयारी का उड्डाणपूल मार्गाबाबत मात्र अद्यापही तोडगा निघाला नाही. त्याचा त्रास सर्वसामान्य माणसाला होत आहे. सध्या केंद्र सरकारमध्ये रावसाहेब दानवे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आहेत. खासदार रणजितसिंह निंबाळकर हेही रेल्वे सोलापूर विभागाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी याबाबत थोडासा रेटा लावला तर लोकांना हवा तसा पूल येथे निर्माण होईल, अशा कुर्डूवाडीकरांच्या भावना आहेत, असं येथील डॉ. विलास मेहता यांनी सांगितलं.
-----
चार प्रभाग इधर चार उधर
शहरातील नगरपरिषदेच्या ८ प्रभागांपैकी १ ते ४ प्रभाग हे रेल्वे गेटच्या पलीकडे उत्तरेकडे तर ४ प्रभाग रेल्वे गेटच्या दक्षिणकडे असे विभागले गेले आहेत. रेल्वे गेटच्या एका बाजूला रेल्वे वसाहत, रेल्वे दवाखाना, कारखाना,रेल्वेचे विविध कार्यालय,काॅलेज, शाळा, महावितरण कार्यालय आहेत. तर दुसऱ्या बाजूला नगरपालिका, पंचायत समिती, प्रांतकार्यालय, पोलीस ठाणे, सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये बँका, दवाखाने, भाजी मंडई, मुख्य बाजारपेठ, शाळा, महाविद्यालये आहेत.
---
प्रशासनाला सवड मिळेना
शहरातील दोन्ही बाजूला राहणाऱ्या लोकांना गेटमधून येणे जाणे हे क्रमप्राप्त आहे. रेल्वे काॅलनी परिसरातील जनतेला आपल्या दैनंदिन गरजा व कार्यालयीन कामकाजासाठी गेट ओलांडून नेहमीच यावे लागते. तब्बल चौदा वर्षांपासून येथील शहरवासीय याला विरोध करत आले, पण प्रशासनाला या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हे दुर्दैव आहे, असं आरपीआयचे नेते आकाश जगताप यांनी सांगितले.
----
१० कुर्डूवाडी रेल्वे
कुर्डूवाडी शहरातील मध्यवर्ती असलेले पण रेल्वे विभागाने कायमस्वरूपी बंद केलेलं हेच ते रेल्वे गेट. ज्यामूळे कुर्डूवाडी शहराचे दोन भाग झाले आहेत.
090921\54392117img-20210909-wa0321.jpg
कुर्डूवाडी येथील मध्यवर्ती भागात असलेलं व बंद करण्यात आलेले रेल्वे गेट