दोन विमाने उडाली, पण कृत्रिम पाऊस पडलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:49 AM2019-07-30T03:49:20+5:302019-07-30T03:49:23+5:30
सोमवारी दिवसभर काळे ढग असताना विमानांचे उड्डाण झाल्याचे समजल्याने कृत्रिम पाऊस पडणार असे वाटत होते.
सोलापूर : दोन विमाने हवेत उडाली व पाहणी करून परत आली एवढीच प्रतिक्रिया कृत्रिम पावसाबाबत सोमवारी देण्यात आली. पुष्य नक्षत्रही कोरडेच जाऊ लागल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांना कृत्रिम पावसाचा आधार मिळेल असे वाटत असले तरी सध्या तसे चित्र नाही.
सोमवारी दिवसभर काळे ढग असताना विमानांचे उड्डाण झाल्याचे समजल्याने कृत्रिम पाऊस पडणार असे वाटत होते. काही भागात रिमझिम सरीही पडल्या. त्यामुळे कृत्रिम पाऊस पडल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. विमान ज्या भागातून गेले त्या भागातील लोकांनी कृत्रिम पाऊस पडल्याची भावना व्यक्त केली आहे. असे असले तरी याला भारतीय उष्णदेशीय हवामान विज्ञान संस्थेने दुजोरा दिला नाही. एका विमानाचे दुपारी एक वाजता व दुसºया विमानाचे अडीच वाजता उड्डाण झाले. ही दोन्ही विमाने सायंकाळी पाचनंतर सोलापूर विमानतळावर दाखल झाल्याचे सांगण्यात आले.