दोन निवृत्त उपोषणकर्त्यांची बिघडली तब्येत; प्रशिक्षण व विभागीय परीक्षेतून सूट देण्याची मागणी
By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 26, 2022 08:47 PM2022-12-26T20:47:52+5:302022-12-26T20:48:01+5:30
सिंचनसमोर आंदोलन
सोलापूर: सिंचन विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या वय वर्ष ४५ दरम्यान प्रशिक्षण व विभागीय परीक्षेतून सूट न दिल्याने जिल्ह्यातील अडीचशेहून अधिक सेवानिवृत्त कर्मचारी स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पदापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या सूचनेनुसार १३ पदावरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सूट देण्याची मागणी सेवानिवृत्त स्थापत्य सहायक व क्षेत्रीय कर्मचारी कृती समितीकडून होत आहे.
मागणी मान्य होत नसल्याने मागील १५ दिवसांपासून सेवानिवृत्त कर्मचारी सिंचन भवनासमोर चक्री उपोषण करत आहेत. यातील दोन उपोषणकर्त्यांची आंदोलनस्थळी तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. यामुळे आंदोलनस्थळी काळजीचे वातावरण आहे. एम. जे. गायकवाड तसेच वंदन कमलाकर या दोन निवृत्त कर्मचाऱ्यांची आंदोलनस्थळी तब्येत बिघडल्याची माहिती कृती समितीचे अध्यक्ष एम. एस. देवकते यांनी दिली.