पहारेकºयांच्या दोन खोल्या, चौकोनी बुरुजावर जाणारा रस्ता झाला खुला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 01:00 PM2020-02-27T13:00:20+5:302020-02-27T13:02:52+5:30
शिवप्रेमींच्या श्रमदानाचे फळ; पर्यटकांना शहराची टेहळणी करणे होणार शक्य
सोलापूर : भुईकोट किल्ल्यातील काटेरी झुडपे हटवल्यानंतर पहारेकºयांच्या दोन खोल्या आणि चौकोनी बुरुजाकडे जाणारा रस्ता खुला झाला आहे. पर्यटकांना लवकरच या बुरुजावरून सोलापूरची ‘टेहळणी’ करणे शक्य होणार आहे.
सोलापूरच्या भुईकोट किल्ल्यात ३०० वास्तू असल्याची नोंद ऐतिहासिक दस्तावेजांमध्ये आहे. अंतर्गत भागात पडझड झाल्याने काळाच्या उदरात काही वास्तू नष्ट झाल्या तर काही काटेरी झुडपात अडकल्या. किल्ले संवर्धनासाठी काटेरी झुडपे हटविण्याचे काम सुरू झाले. मल्लिकार्जुन मंदिरासमोरील झुडपे हटवल्यानंतर १५ दिवसांपूर्वी आदिलशहाच्या काळातील विहीर खुली झाली. या विहिरीच्या समोरील भागात पहारेकºयांच्या दोन खोल्या आढळून आल्या आहेत.
कमानीयुक्त खोल्या स्थापत्यकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या खोल्यांमध्ये माती, दगडांचे ढिगारे असून, ते हटवणे गरजेचे आहे. त्यानंतर पर्यटकांना व्यवस्थित पाहता येतील.
किल्ल्यातील चौकोनी बुरुज हा आणखी एक मोठा बुरुज म्हणून ओळखला जातो. किल्ल्यातील चौकोनी आकाराचा एकमेव बुरुज आहे. त्यावर तोफ ठेवण्याची व्यवस्थाही आहे.
चारही मार्गाने येणाºया शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या बुरुजाचा वापर केला जायचा. काटेरी झुडपे वाढल्यानंतर बुरुजाकडे जाणारा रस्ता बंद झाला होता. पर्यटकांना केवळ दूरूनच पाहावे लागायचे. आता मात्र रस्ता दिसू लागला आहे. थोडीशी डागडुजी केल्यानंतर रस्ता खुला होईल.
काटेरी झुडपे हटवल्यानंतर अनेक वास्तू समोर येत आहेत. पडझड झालेला भाग हटविल्यानंतर आणखी वास्तू खुल्या होतील, असे इतिहास अभ्यासक नितीन अणवेकर यांनी सांगितले.
भुईकोटातील महत्त्वाचे बुरुज
- महाकाली बुरूज, पद्मावती बुरूज, चौकोनी बुरूज, निशान बुरूज, अष्टकोनी बुरूज. प्रत्येक बुरुजावर तोफ ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. बंदुकीतून मारा करण्यासाठी भिंतीत जंग्यांची व्यवस्था केलेली दिसून येते. बुरुजामुळे किल्ल्याला भक्कमपणा प्राप्त होतो.
चौकोनी बुरुजावर शिल्पपट, कीर्तिमुख
- अणवेकर म्हणाले, चौकोनी बुरुजावर शिल्पपट आहे. या शिल्पात हत्तीवर स्वार दोन व्यक्तींच्या मागे चार सैनिक एका हातात आयताकृती ढाल व एका हातात तलवार घेऊन हत्ती मागे चालत आहेत. हे शिल्प खंडित झाल्यामुळे या शिल्पात हत्तीचा फक्त मागील पाय व हत्तीवर बसलेल्या दोन व्यक्ती दिसतात. याशिवाय बुरुजावर कीर्तिमुखाची माळ अत्यंत सुंदर अशी नक्षीवेल आहे. ही दोन्ही शिल्पे आता सर्वांनाच पाहता येणार आहेत.