पोहायला येत नसल्याने दोन शाळकरी तळ्यात बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:27 AM2021-08-13T04:27:03+5:302021-08-13T04:27:03+5:30
गुरुवारी मंगळवेढा- पंढरपूर रोडलगत असलेल्या खवतोडे यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी मंगळवेढा शहरातील किल्ला भागातील शाहदाब अमजद रजबअली (वय ११), ...
गुरुवारी मंगळवेढा- पंढरपूर रोडलगत असलेल्या खवतोडे यांच्या शेतातील शेततळ्यात पोहण्यासाठी मंगळवेढा शहरातील किल्ला भागातील शाहदाब अमजद रजबअली (वय ११), प्रज्वल हेमंत लोहार (वय १०), वैभव देसाई व शुभम लोहार हे चौघे मित्र सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास गेले. दरम्यान, ते सर्व जण पोहत असताना शाहदाब रजबअली व प्रज्वल लोहार यांना मात्र पोहता येत नव्हते. तरीही ते पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या शहदाब रजबअली व प्रज्वल लोहार यांचा तळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे व सहायक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांना उपचारासाठी दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी तपासणी करून मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत असीफ दरवाजकर व हेमंत लोहार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार अकस्मात मुत्यू झाल्याची नोंद झाली. अधिक तपास हवालदार तुकाराम कोळी व पोलीस नाईक तळवार करीत आहेत.
----
नातलगांनी फोडला हंबरडा
मयत शाहदाब हा आई-वडिलांना एकुलता एक मुलगा होता. या बालकांचे मृतदेह पाहिल्यानंतर त्यांच्या आईने व नातेवाइकांनी हंबरडा फोडला. या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या नातेवाईकांना प्रचंड धक्का बसला.
----
मित्रांची हाक पोहोचलीच नाही
पाण्यात बुडत असलेल्या त्या दोन मित्रांना वाचविण्यासाठी इतर दोन मित्र रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना थांबवून धाय मोकलून रडत ‘माझ्या मित्राला वाचवा, वाचवा’, असा टाहो फोडत होते. मात्र, कोणीही थांबले नाही. त्यामुळे त्या दोन निष्पाप जीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.
---