तीन दिवसांचा डबा घेऊन मध्यप्रदेशच्या मजुरांना सोडायला गेले एसटीचे दोन चालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 03:43 PM2020-05-13T15:43:17+5:302020-05-13T15:45:37+5:30
मजुरांची गाडी नागपूरसाठी रवाना; साडेसातशे किलोमीटरच्या प्रवासात एकच थांबा
सोलापूर : राज्य परिवहन महामंडळ सोलापूर विभागातील सोलापूर आगारातून परराज्यातील मजुरांना घेऊन पहिली एसटी गाडी मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नागपूरकडे रवाना झाली. लांबचा पल्ला असल्यामुळे एका गाडीसाठी दोन चालकांना पाठवण्यात आले तर दोन्ही चालक तीन दिवसांसाठीची जेवणाची व्यवस्था सोबत घेऊन निघाले आहेत.
परराज्यातील अडकलेल्या मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी राज्य शासनाने एक पाऊल पुढे टाकत मजुरांसाठी राज्याच्या बॉर्डरपर्यंत सोडण्यासाठी मोफत एसटीची व्यवस्था केली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांना एकप्रकारचा दिलासा मिळाला आहे. अशाच प्रकारे सोलापुरात अडकलेल्या मध्यप्रदेशातील २१ प्रवाशांना सोडण्यासाठी सोलापुरातील पहिली एसटी नॉर्थकोट येथून निघाली.
या सर्व प्रवाशांना मध्यप्रदेशमध्ये जायचे आहे. त्यांना राज्य शासनाच्या वतीने नागपूरच्या पुढे शंभर किलोमीटरवर असणाºया दिंडोरीच्या म्हणजेच राज्याच्या सीमेवर सोडण्यात येणार आहे.
या प्रवासासाठी चालकांना शक्यतो बाहेरील काही न खाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे या चालकांनी आपल्यासोबत तीन दिवस पुरेल इतक्या जेवणासह आपला प्रवास सुरू केला आहे. लांबच्या पल्ल्यात ही एसटी फक्त दोन ठिकाणी थांबणार असून, पहिला स्टॉप लातूर येथे आणि दुसरा स्टॉप हा नागपूरला असणार आहे.
यावेळी एसटी प्रशासनाच्या वतीने आगार व्यवस्थापक दत्तात्रय कुलकर्णी, स्थानक प्रमुख प्रमोद शिंदे, वाहतूक नियंत्रक मनोज मुदलियार, सुनील भोसले, नागेश रामपुरे हे उपस्थित होते. गाडीसोबत चालक माळी, खजगे हे गेले आहेत.
वीस भाकरी, पिटलं घेऊन सुरू प्रवास
- एकूण तीन दिवसांचा प्रवास असल्यामुळे यात बाहेरचे खाणे हे विनाकारण शंकेला ऊत येण्यासारखे आहे. यासाठी एका चालकाने तीन दिवसांसाठी वीस कडक भाकरी आणि पिटलं आणि दोन दिवस पुरेल इतके पाणी घेऊन प्रवास करत आहेत, असे चालकांनी सांगितले.